Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

बेमेतरा (छत्तीसगड) – येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक लोकांनी सामूहिक धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरात हे धर्मांतर झाले. काही घरांवर ‘क्रॉस’ चिन्हेही आढळून आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. धर्मांतरितांना रोगापासून मुक्ती आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचे आमीष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

१. येथील हिंदु संघटनेशी संबंधित सदस्यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये रहाणार्‍या गोंड समाजाच्या ५ कुटुंबांच्या पूजा पद्धती आणि जीवनशैली यात झालेल्या पालटाची माहिती घेतली. या वेळी त्यांना समजले की, आधी रायपूरला प्रार्थनेसाठी गेलेली ही कुटुंबे आता  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरात राहायला लागली आहेत. या सर्वांनी मिळून या घराचे चर्चमध्ये रूपांतर केल्याचा आरोप आहे. संपूर्ण तहसील परिसरात हे एकमेव चर्च असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी धर्मांतरित कुटुंबे भंगाराचे काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत असत. जरी त्यांचा व्यवसाय अजूनही पारंपरिक असला, तरी त्यांची जीवनशैली पालटली आहे.

२. हिंदु संघटनांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या घरावर ख्रिस्त्यांची पवित्र चिन्हे लावली जात आहेत, त्या घरांना टाळे ठोकण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !