‘भाव तिथे देव’ किंवा ‘देव भावाचा भुकेला’, हे आपण ऐकले आहे. देवाला भाव असणार्या व्यक्ती पुष्कळ आवडतात; याउलट अहंभाव असलेल्या व्यक्तींना देव दूर ठेवतो. ‘अहंभावाचा पूर म्हणजे देवापासून दूर’, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. बर्याच वेळा साधकांचे सेवा (कार्य) करण्याकडे पुष्कळ लक्ष असते; मात्र ते स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. चेन्नई येथील एका मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी अनुभवलेल्या एका प्रसंगावरून ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन न केल्यास ‘व्यक्ती देवापासून कशी दूर जाते ?’, ते माझ्या लक्षात आले.
(भाग ९)
१. मोठ्या कार्यक्रमाच्या सेवेसाठी चेन्नई येथे गेल्यावर तिथे एका प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख होणे आणि तिला सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ आवडणे
एप्रिल २००९ मध्ये चेन्नई (तमिळनाडू) येथे प्रथमच एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी मी तिथे गेलो होतो; पण तिथे अत्यल्प, म्हणजे केवळ ५ – ६ एवढेच साधक होते. ‘एवढ्या अल्प साधकांमध्ये कार्यक्रमाचा प्रचार कसा करायचा ?’, याविषयी मी अभ्यास करत होतो. त्याच सुमारास आमची एका सायं दैनिकाच्या संपादकांशी भेट झाली. ‘ते संपादक तमिळनाडू राज्याच्या प्रशासनामध्ये उच्च पदावर कार्यरत होते. ते अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे समाजात त्यांच्या पुष्कळ लोकांशी ओळखी आहेत’, असे आम्हाला कळले. आम्ही त्यांना भेटलो. त्यांना कार्यक्रमाची संकल्पना आणि सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ आवडले.
२. प्रतिष्ठित व्यक्तीने मोठ्या कार्यक्रमासाठी केलेले साहाय्य !
चेन्नई येथे अजून सनातन संस्थेचे कार्य चालू झाले नव्हते. त्यामुळे आम्हाला ‘कार्यक्रमाचा प्रचार कसा करायचा ?’, हा मोठाच प्रश्न होता. देवाने तो प्रश्न त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या माध्यमातून बर्याच प्रमाणात सोडवला.
अ. त्या प्रतिष्ठित व्यक्तीने त्यांच्या वृत्तपत्रात त्या मोठ्या कार्यक्रमाविषयी पानभर लेख लिहिला, तसेच सनातन पंचांग आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयीही मोठे लेख लिहिले.
आ. त्यांनी आम्हाला समाजातील काही चांगल्या लोकांचे संपर्क क्रमांक दिले. आम्हाला त्या संपर्कांचा प्रचारासाठी चांगला उपयोग झाला.
इ. तिथे आम्ही कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जिज्ञासूंची एक बैठक घेतली. त्या बैठकीतही त्यांनी पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारे विषय मांडला.
ई. त्यांनी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी साधकांसाठी अल्पाहार आणि चहा-पाण्याची व्यवस्थाही आम्ही रहात होतो, तिथे येऊन केली.
उ. चेन्नई येथील कार्यक्रमात ते वक्ता म्हणूनही बोलले.
३. प्रतिष्ठित व्यक्तीत पुष्कळ अहं असल्याने साधकांना त्यांच्याशी संवाद साधण्यास अडचण येणे
त्या प्रतिष्ठित व्यक्तीने आम्हाला पुष्कळ आणि चांगले साहाय्य केले; परंतु त्या व्यक्तीमध्ये पुष्कळ अहं होता. ‘ते सांगतील, तसेच व्हायला हवे’, असे त्यांना वाटायचे. त्यांच्या बोलण्यात पुष्कळ अधिकारवाणी जाणवायची. त्यामुळे काही वेळा आम्हाला त्यांच्याशी संवाद साधण्यास अडचण यायची.
४. प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये पुष्कळ अहंभाव असल्याने त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट होऊ न शकणे
गुरुदेवांच्या कृपेने चेन्नई येथील कार्यक्रम पुष्कळ छान झाला. त्या कार्यक्रमानंतर त्या व्यक्तीच्या मनात प.पू. डॉक्टरांना भेटण्याची पुष्कळ उत्सुकता निर्माण झाली. कार्यक्रम झाल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी प.पू. डॉक्टरांना भेटायला रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात जातो. तसे माझे नियोजन करा.’’ मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींसाठी साधकाच्या माध्यमातून निरोप पाठवला, ‘‘ती प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छिते.’’ तेव्हा त्या साधकाने त्यांचा मला निरोप दिला, ‘‘त्यांना आधी सनातन-निर्मित ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा ग्रंथ भेट द्या. त्याचा त्यांना अभ्यास करू दे. नंतर आपण भेटीचे पाहू’, असे सांगा.’’ त्याप्रमाणे साधकांनी त्यांना तो ग्रंथ भेट दिला. वर्ष २०१४ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंतही त्यांची प.पू. गुरुदेवांशी भेट होऊ शकली नाही !
५. ‘देवाला अहंभावाने केलेली कृती आवडत नसून भावपूर्ण केलेली सेवाच देवाच्या चरणी रुजू होते’, हे लक्षात येणे
वरील प्रसंगावरून माझ्या असे लक्षात आले, ‘आपण कितीही चांगली कृती केली; परंतु ती अहंभावाने केली, तर ती देवाला आवडत नाही. भावपूर्ण सेवाच देवाच्या चरणी रुजू होते; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली नेहमी म्हणतात, ‘‘तुम्ही कुठली कृती करता, ते महत्त्वाचे नसून त्या कृतीमागील तुमचा भाव काय आहे ?’, ते देव पहातो.’’
६. ‘स्वभावदोष आणि अहं लक्षात येण्यासाठी अन् ते दूर करण्यासाठी सेवा हे माध्यम आहे’, हे लक्षात घेऊन स्वभावदोष अन् अहं दूर करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक असणे
वरील प्रसंगातून ‘या सेवेच्या माध्यमातून देवाला मला काय शिकवायचे आहे ?’ किंवा ‘ही सेवा करतांना माझे कुठले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रकट होत आहेत’, याकडे लक्ष देऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वभावदोष आणि अहं दूर केल्यास श्री गुरूंच्या लवकर जवळ जाता येते’, हे मला शिकता आले.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |