छत्रपतींचे नाव घेतल्याने मुसलमानांची मते मिळणार नाहीत, असे पवारांना वाटायचे !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान !

मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ( डावीकडे)

कल्याण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत केव्हाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही; पण आता संकटकाळात त्यांना छत्रपती आठवत आहेत. तुतारी चिन्ह मिळाले, तर आता ती फुंका. त्यांना आज रायगडाची आठवण झाली. आतापर्यंत त्यांना शिवरायांचे नाव घेतल्यास मुसलमानांची मते मिळणार नाहीत असे वाटत होते, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर २४ फेब्रुवारी या दिवशी टीका केली. शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाचे २४ फेब्रुवारी या दिवशी रायगड येथे अनावरण करण्यात आले.

राज ठाकरे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल, तर मी एका मुलाखतीत शरद पवार यांना ‘तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेता; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही’ असे म्हटले होते. त्यावर त्यांनी मौन साधले होते; कारण शिवछत्रपतींचे नाव घेतले, तर मुसलमानांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी एवढी वर्षे काढली.

ते म्हणाले की, सद्य:स्थितीत महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक चालू आहे. पुणे येथे काही दिवसांपूर्वी १०० व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक मला भेटले. मी त्यांना ‘तुम्ही कोणत्या गटाचे ?’, असा प्रश्न केला. त्यावर २-३ जणांनी ते शरद पवार गटाचे असल्याचे सांगितले, तर उर्वरित सर्वांनी ‘ते अजित पवार गटाचे आहेत’, असे सांगितले. ज्या तरुणांना राजकारणात यायचे आहे, त्यांना हा आदर्श देणार आहोत का ? असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहिजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहील.