मोक्षदायिनी काशीनगरी !

काशी, बनारस किंवा वाराणसी ही काशीक्षेत्राची काही प्रसिद्ध नावे आहेत. काशीचा अर्थ प्रकाश देणारे नगर, पवित्र, तेजस्वी नगर ! वरुणा (नदी) ते अस्सी (घाट) पर्यंत हा प्रदेश असल्यामुळे त्याला वाराणसी म्हणतात. संगीत, भक्ती आणि श्रद्धेचा रस या ठिकाणी कायम असल्यामुळे तिला ‘बनारस’ असेही म्हणतात. या प्रदेशाची अनेक नावे प्रसिद्ध आहेत. हिंदूंमध्ये काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काशी ही मोक्षदायिनी आहे. अशा या काशीविषयी आणि तेथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग विश्वनाथ मंदिराविषयी आज या लेखातून जाणून घेऊया.

१. ज्ञानवापी प्रकरणामुळे काशीची चर्चा

ज्ञानवापीविषयी चालू असलेल्या खटल्यात हिंदूंच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय लागून हिंदूंना तेथील व्यास तळघरात जाऊन पूजा करण्याची अनुमती मिळाली. खरे म्हणजे वर्ष १९९३ पर्यंत येथे नियमित पूजा होत होती; मात्र मुलायमसिंह यांनी तोंडी आदेश देऊन ती बंद केली होती. त्याच पूजेला पुन्हा अनुमती मिळाली आहे. लगोलग हिंदु भाविकांची तिथे रीघ लागली. काशीविश्वनाथाचे मूळ स्थान या मशिदीच्या ठिकाणी आहे, अशी हिंदु भाविकांची श्रद्धा आहे. औरंगजेबाने या जागी असलेले मूळ मंदिर तोडून त्याच्या अवशेषांद्वारे मशीद बांधली, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. या मशिदीच्या शेजारी सध्या जे मंदिर बांधले आहे, ते राणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. महत्त्वाचे म्हणजे या नवीन मंदिरातील मूळ नंदीचे स्थान मात्र हलवलेले नाही. या नंदीचे मुख ज्ञानवापीच्या दिशेनेच आहे. ‘शिवमंदिरात नंदीचे मुख हे भगवान शिवाच्या पिंडीकडेच असते’, हे हिंदूंना ज्ञात आहे. सध्या मंदिर आणि मशीद यांना विलग करणारी एक भिंत आहे. ही भिंत भगवान शिवाच्या कृपेने आणि कायदेशीर विजय होऊन एक ना एक दिवस निघेल अन् नंदीसह आपण सर्व शिवभक्तांना भगवान शिवाचे दर्शन होईल, भक्त आणि भगवंत यांचे मीलन होईल अशी आशा बाळगूया.

२. काशीच्या शिवलिंगाचे सामर्थ्य !

विश्वनाथ शिवलिंगाविषयी सांगितले जाते की, ते उखडून टाकण्याचा, पळवून नेण्याचा प्रयत्न वारंवार मंदिरावर आक्रमण करणार्‍या जिहादी शासकांनी केला; मात्र ते एक इंचही जागचे हलले नाही. क्रूर आक्रमकांनी मंदिराची संपत्ती लुटली, मंदिर पाडले; मात्र शिवलिंग जागच्या जागीच राहिले. ही आहे भगवान शिवाची शक्ती !

३. काशीखंडाचे माहात्म्य

श्री. यज्ञेश सावंत

काशीच्या माहात्म्यासंबंधी अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. ‘स्कंदपुराणा’त एक खंड काशीखंड आहे. ज्यामध्ये काशीचा परिचय, माहात्म्य, आधिदैविक स्वरूपाचे वर्णन आहे. काशीला ‘आनंदवन’ असेही म्हटले जाते. काशीच्या अलौकिक महत्त्वाविषयी भगवान शिवाने पार्वतीमातेला सांगितले. कार्तिकेयाने ते आईच्या कुशीत बसून ऐकले आणि नंतर अगस्तिऋषींना ते सांगितले. ऋषींनी ते शब्दबद्ध केले, तोच हा काशीखंड ! त्यामध्ये १०० अध्याय आणि ११ सहस्रांहून अधिक श्लोक आहेत. यात काशीचा भूगोल, इतिहास, तेथील मंदिरांच्या स्थापनेमागील कथा, देवतांविषयी माहिती यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. ऋग्वेद, पुराणे, महाभारत यांमध्येही काशीचे वर्णन आहे. यातून काशीच्या प्राचीनतेचा अंदाज येऊ शकतो.

४. ज्ञानवापीविषयी पुराणातील माहिती

काशीखंडातील ३४ व्या अध्यायातील ३६ ते ३९ या श्लोकांत ज्ञानवापीचे माहात्म्य आहे. ‘ज्ञानवापी’ हे ‘काशीचे मूळ केंद्र’, असे वर्णन केले आहे. ज्ञानवापी हा शब्द ज्ञान आणि वापी या दोन शब्दांपासून बनला आहे. त्याचा अर्थ होतो ज्ञानाच तलाव !

४ अ. काशीतील घाट : काशीत पुराणकालीन ८० घाट आहेत. प्रत्येक घाटाच्या निर्मितीची एक आख्यायिका आणि वैशिष्ट्य आहे. सूर्याेदय, नारद, राजा, हरिश्चंद्र, गंगा, दश्वाश्वमेध, अस्सीसंगम, मणिकर्णिका आणि पंचगंगा घाट असे अनेक घाट आहेत. राजा घाट थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेला आहे. मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार अखंड चालू असतात, म्हणजेच चिता अखंड जळत असतात. एका श्लोकानुसार ‘काशीत मरण ही मंगलमय आहे’ मानले जाते. हिंदु भाविक श्रद्धावान असल्याने आणि ज्यांना स्वत:चा शेवट किंवा स्वत:चे अंतिम संस्कार काशी येथे व्हावेत, अशी इच्छा बाळगतात, त्यांचे विधी येथे केले जातात. या विविध घाटांना लागून गंगा नदी अखंड प्रवाहित असते. सायंकाळी ‘गंगा आरती’ विशेष प्रसिद्ध आहे. दशाश्वमेध घाटावर ही आरती होते, तसेच अन्य काही महत्त्वाच्या घाटांवर सामूहिक स्तरावर केल्या जाणार्‍या या आरतीसाठी भारतियांसह विदेशी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येत उपस्थित असतात. ही आरती पहाण्यासारखी असते. आरतीच्या वेळी गंगानदीत दिवे सोडले जातात.

५. काशीची व्याप्ती

काशीची मुख्य रक्षक देवता किंवा कोतवाल म्हणजे कालभैरव आहे. कालभैरवाचे मंदिर एका गल्लीत आहे. काशीत १ सहस्र ५०० हून अधिक मंदिरे आहेत, म्हणजेच प्रत्येक गल्लीत एक मंदिर आहे. काशीतील ‘संकटमोचन हनुमान मंदिर’ प्रसिद्ध आहे. आतंकवाद्यांनी काही वर्षांपूर्वी येथे बाँबस्फोट घडवून आणला होता. यासह येथे लोलक तीर्थ, संगम तीर्थ अशी शेकडो तीर्थे काशीत आहेत. काशीखंडात १५० तीर्थांचे, ५६ विनायक मंदिर आणि १४ महालिंग यांचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे काशीत अनेक शिवमंदिरे आहेत. येथील बनारस हिंदु विश्वविद्यालय जे भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केले होते, ते जगप्रसिद्ध आहे.

६. बनारसी पान आणि मिठाई

‘बनारसी पान’ येथे प्रसिद्ध आहे. हे पान शिवाला प्रिय आहे, असे सांगितले जाते. या पानाचा विड्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात काही दुकानांमध्ये २५ हून अधिक पदार्थ घालून ते सिद्ध केले जाते. या पानाचे काही औषधी उपयोगही आहेत. दुसरे महत्त्वाचे, म्हणजे बनारस येथे मिळणार्‍या विविध प्रकारच्या मिठाया ! या मिठाया आपण कधी न ऐकलेल्या, पाहिलेल्या एवढ्या प्रकारांत उपलब्ध आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथे मिठायांचे २ सहस्रांहून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. येथील दुधाचे सर्व पदार्थ अत्यंत चवदार आणि शुद्ध स्वरूपात मिळतात. यातून बनारस हे काशीचे नाव सार्थ होते.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी यांची प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी ‘काॅरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) निर्माण करून भक्त-भाविक यांना सुविधा देण्याचा मानस आहे. त्यानुसार काशी विश्वनाथ मंदिराच्या आसपासची दुकाने, घरे, काही मंदिरे हटवून सुसज्ज असा मार्ग केला आहे. त्यामुळे भक्तांना येथे सुलभ दर्शन होते.

अशी ही काशी तिच्या अनुपम सामर्थ्याद्वारे, सात्त्विकतेद्वारे आणि सौंदर्याद्वारे हिंदु भाविकाला स्वत:त सामावून घेते, त्याला आपलेसे करते. काशीत कचरा, काही अव्यवस्था, अस्वच्छता आपल्याला दिसली, तरी तेथील वैशिष्ट्यपूर्ण आणि दैवी चैतन्याने भारीत वातावरणात त्याची जाणीवही आपल्याला होत नाही. काशीला जाऊन आल्यावर, काशी यात्रा पूर्ण केल्यावर आयुष्यात काहीतरी मिळवल्याचा आनंद त्याला होतोच होतो.’

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (७.२.२०२४)

काशीविश्वनाथ मंदिराचा थोडक्यात इतिहास

काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. वर्ष १०३४ मध्ये मंदिर पाडण्यात आले. ते उभारल्यावर नंतर वर्ष ११९४ मध्ये महंमद घौरीचा सेनापती कुतुबुद्दिन ऐबक याने मंदिर तोडले, एका गुजराती व्यावसायिकाने ते उभारले. पुन्हा वर्ष १४४७ मध्ये जौनपुरचा सुलतान महमूद शाह शर्की याने मंदिर पाडले, अकबराच्या नवरत्नांपैकी राजा तोडरमल याने पुन्हा वर्ष १५८५ मध्ये मंदिर बांधले. वर्ष १६३२ मध्ये शहाजहान याने हे मंदिर तोडण्यासाठी सैन्य पाठवले, या वेळी हिंदूंनी तीव्र विरोध केल्यानंतर शहाजहान हे मंदिर पाडू शकला नाही; मात्र आसपासची ६० हून अधिक मंदिरे तोडली.

औरंगजेबाने वर्ष १६६९ मध्ये मंदिर आणि संस्कृत विद्यालय पाडण्याचा आदेश दिला. तेव्हा ते पाडण्यात आले. मासिर-ए-आलमगिरी या पुस्तकात लेखक मुस्तईद खान याने औरंगजेबाच्या मंदिर तोडण्याच्या फर्मानाचा उल्लेख केला आहे. इतिहासकार ऑड्रे दुश्के याच्या औरंगजेबावरील पुस्तकानुसार ज्ञानवापी मशीद औरंगजेबाच्या काळात बांधली गेली. या मशिदीमध्ये मूळ विश्वनाथ मंदिराच्या अवशेषांचा वापर करण्यात आला. यानंतर मराठ्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मशीद पाडण्यासाठी मोठे सैन्य घेऊन आले; मात्र तेथील पुजार्‍यांनी त्यांना ‘तुम्ही मशीद पाडून निघून जाल; मात्र मोगलांचा सामना आम्हाला करावा लागेल’, असे सांगितल्याने त्यांनी तो बेत रहीत केला.

वर्ष १७७७ मध्ये इंदूरच्या राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधण्याचा निश्चय केला आणि ३ वर्षांत मंदिर बांधून पूर्ण झाले. ब्रिटीश वास्तूविशारद आणि लेखक जेम्स प्रिन्सेप यांनी वर्ष १८३१ मध्ये वाराणसीविषयी त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकात लिथोग्राफी तंत्राद्वारे मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे दिले होते. मंदिराचा नकाशा पुस्तकात दिला. विश्वेश्वर मंदिराच्या भोवती ३ इमारतींनी वेढलेल्या मशिदीचे चित्र दाखवले आहे. ज्ञानवापी मशिदीच्या मोठ्या घुमटावर उलटे कमळ, कलश त्यांनी दाखवले आहे.

सध्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळालेले व्यास कुटुंबीय वर्ष १५५१ पासून या मंदिराशी निगडित आहेत.

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !

जेव्हा आपण काशीविश्वनाथ मंदिरात मुख्य मार्गावरून दर्शन घेण्यास जातो, तेव्हा आपल्या समोर विश्वनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागे एका कोपर्‍यात ज्ञानवापी दिसते, तर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर अगदी लागून असलेली मशीद दिसते. तेव्हा हिंदूंच्या या मंदिराचे रक्षण करण्यासाठी, आपल्या पूर्वजांनी केवढा अतुलनीय पराक्रम केला आणि बलीदान दिले; क्रूर, जुलमी, धर्मांध मोगलांचे अनन्वित अत्याचार झेलेले, त्याविषयी त्यांच्याविषयी कृतज्ञताच वाटते. अनेक आक्रमणांमध्येही मंदिराचे हे स्थान टिकवले अन् रक्षण केले आहे. आता काशीविश्वनाथ मंदिर अगदी दिमाखात उभे आहे, जणू शिवलोकाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे ! योगी आदित्यनाथ आणि मुसलमानांमधील काही विद्वान यांनी ‘मुसलमानांनी ज्ञानवापी हिंदूंना सोपवण्यात यावी, मोठे मन दाखवावे’, असे आवाहन केले आहे. अन्यथा संघर्ष अटळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या अंतिम क्षणी ‘काशीच्या विश्वेश्वराला सोडवा, चुकूर होऊ नका !’, अशी आज्ञाच हिंदु समाजाला दिली होती. ती पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे ! – श्री. यज्ञेश सावंत