आज ‘भगवान महावीर यांची जयंती’ आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

१. समाजपरिवर्तनाचा अमोघ मार्ग
‘भगवान महावीर कर्मवादी होते. मनुष्याचा देह कोणत्याही जातीत आणि स्थितीत जन्मास येवो त्याची श्रेष्ठता कर्माप्रमाणेच असते. हलक्या कुळात जन्माला येऊनही उत्तम कर्मांनी मनुष्य महान बनू शकतो आणि कितीही चांगल्या जातीत अन् स्थितीत जन्माला आलेला आपल्या दुष्कर्मांनी अधःपतित होतो. मनुष्याची ही कर्मे त्याच्या वासनेप्रमाणेच होतात. मन वासनामयच असते. सत्संस्कारांनी हे मन शुद्ध करता आले, वासना विशुद्ध झाल्या, तर आपोआप कर्मेही उत्तम होतील; म्हणून जितक्या अधिक लोकांची चित्तशुद्धी होईल, समाज तितका सुखी होत जाईल. कुसंगती आणि विकार यांनी आलेले कुसंस्कार सत्संगती अन् तपाचरणाने नष्ट होतात. समाजपरिवर्तनाचा हा अमोघ मार्ग आहे.
२. दानवतेच्या संस्कारामुळे मनुष्याची होणारी स्थिती
राजगृहातील अर्जुन नावाच्या एका माळ्यावर भीषण प्रसंग ओढवला. तो यक्षदेवतेचा भक्त होता. दुर्दैवाने एके दिवशी ६ डाकूंनी मिळून त्याच्या घरावर घाला घातला आणि अर्जुनाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. त्यांनी अर्जुनाला बांधले होते; पण कृद्ध (क्रोधित) झालेल्या अर्जुनाने मनोमन यक्षाचे आवाहन केले. त्याच्या देहात यक्षाचा प्रवेश होताच बंधने तटातट तुटली आणि त्या आवेशात त्याने आपल्या पत्नीसह सहाही डाकूंना ठार मारले; पण आता त्याचा क्रोध शांतच होईना. तो प्रतिदिन ६ पुरुष आणि एका महिलेला ठार मारू लागला. सगळीकडे दहशत पसरली.
भगवान महावीर जेव्हा विहार करत राजगृहाकडे आले, तेव्हा लोकांना अर्जुन माळ्याच्या दहशतीमुळे त्यांच्या दर्शनास जाता येईना; पण सुदर्शन नावाचा एक श्रावक, म्हणजे गृहस्थ भाविक मात्र साहस करून निघाला. अर्जुन माळ्याने त्यावर आक्रमण केले. सुदर्शन ध्यानस्थ उभा राहिला. त्याचे तप आणि शांती यांपुढे अर्जुन विरघळला अन् त्याच्या चरणी कोसळला. त्याला केल्या कर्माचा पश्चात्ताप झाला. सुदर्शनने स्नेहपूर्वक त्याला समजावले, ‘अरे, तूही मनुष्यच आहेस; पण दानवतेचे संस्कार तुझ्यात घुसले आहेत. भीषण हिंसा तुझ्याकडून घडली; पण आता तुझ्या उद्धाराची वेळ आली आहे. तू माझ्यासमवेत कल्याण द्रष्टा महाविरांच्या दर्शनासाठी चल !’
३. पश्चात्ताप, सदाचार आणि तपाचरण हाच भगवान महाविरांनी दिलेला जीवनशुद्धीचा अमोघ मार्ग
सुदर्शनाच्या उपदेशाप्रमाणे अर्जुन त्याच्यासह महावीर प्रभूंच्या दर्शनार्थ आला. पश्चात्तापाचे अश्रू वहात होते. आसुरी स्वभाव लोपला होता. त्याने महाविरांसमक्ष मुनीचर्येचा स्वीकार केला. महाविरांनी त्याला सहनशीलतेचा उपदेश केला; पण आता तो शांत झाला होता, तर त्याने दुखावलेले लोक उग्र बनले होते. ‘याने आमच्या नातेवाईकांना ठार मारले’, असे म्हणत लोक त्वेषाने त्याला मारहाण करत; पण खरच तो पालटला होता. त्याने सर्व काही शांतपणे सोसले. ६ मासांच्या कठोर तपश्चर्येनंतर आमरण उपोषण स्वीकारून केल्या कृत्याचे प्रायश्चित्त घेऊन तो सर्व कर्मांतून मुक्त झाला.
अशी होती भगवान महाविरांची संस्कार प्रक्रिया ! प्रत्येकाच्या अंतरंगी शुद्ध चैतन्य विलसते आहे. त्याच्यावर कुसंस्कारांचा धुरळा साचून जीवन जरी विकृत झाले, तरी ते पुन्हा शुद्ध करता येते. पश्चात्ताप, सदाचार आणि तपाचरण हाच जीवन शुद्धीचा अमोघ मार्ग महाविरांनी अनेक प्रसंगांतून रूजवला.
४. पतितांना पश्चात्तापाच्या माध्यमातून हृदय परिवर्तन करून पावन करणे, हेच संतांचे खरे कार्य !
राजगृहाजवळ वैभार पर्वताच्या दर्या-खोर्यांत रहाणार्या लोहखुर या दरोडेखोराचा पुत्र रोहिणेय असाच अत्याचारी होता. ‘डोके फिरवणार्या मुनी लोकांच्या वार्यासही उभा राहू नकोस’, असा प्रेमाचा सल्ला त्याला वडिलांनी देऊन ठेवला होता; पण एकदा महाविरांच्या सत्संगाजवळून जाण्याचा प्रसंग त्याच्यावर आला. मुनींचे प्रवचन ऐकू येऊ नये; म्हणून त्याने दोन्ही कानांत बोटे घातली; पण एकाएकी पायात बोचलेला काटा काढण्यासाठी त्याला त्याचे हात पायांकडे न्यावे लागले आणि तेवढ्या क्षणात महाविरांच्या उपदेशाचे काही शब्द कानावर पडलेच. ते इतके महत्त्वाचे होते की, त्यामुळे त्याला धरण्यासाठी प्रयत्न करणार्या अभयकुमारने रचलेल्या विलक्षण सापळ्यातूनही तो सुटला. त्याला वाटू लागले, किंचित्शा सदुपदेशाने माझ्यावरील एवढे संकट टळते, मग मी मनापासून सत्संग केला, तर किती मोठा लाभ होईल. तो महाविरांना शरण गेला आणि त्यांच्याकडून संयम साधना स्वीकारली. लोकांचे लुटलेले धनही त्याने परत केले.
अशाच प्रकारे आर्द्रक, किरातराज अशा अनेक लोकांचा उद्धार महाविरांच्या उपदेशाने झाला. पतितांना पश्चात्तापाच्या माध्यमातून हृदय परिवर्तन करून पावन करून घेणे, हेच संतांचे खरे कार्य होय ! पसायदानातील ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तंया सत्कर्मीं रती वाढो ।’, या प्रार्थनेचेच हे क्रियात्मक रूप !’
– प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास
(साभार : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी लिहिलेल्या ‘भगवान महावीर’ ग्रंथातून)