काँग्रेस सदैव बाबराच्या पाठीशीच उभी रहाणार का ? – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका !

हिमंत बिस्व सरमा

निर्मल (तेलंगाणा) – सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते यांना अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण होते. असे असतांनाही ते कार्यक्रमाला उपस्थित का राहिले नाहीत ? श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही का गेला नाहीत ? तुमचे हिंदूंवर प्रेम नाही का ? तुम्ही सदैव ‘रझाकार’ (तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाचे सैन्य) आणि बाबर यांच्याच पाठीशी उभे रहाणार आहात का ? देशवासी कधीही रझाकार आणि बाबर यांच्या पाठीशी उभे रहाणार नाहीत, अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसवर टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या ‘विजय संकल्प यात्रे’च्या शुभारंभाच्या संदर्भात भैन्सा येथे एका जाहीर सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, जिथे राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ निघत आहे तिथे काँग्रेसची घसरण होत आहे. आता राहुल गांधी उत्तरप्रदेशात जाणार आहेत; पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. न्याय यात्रा जिथे जाईल तिथे काँग्रेसवर ‘अन्याय’ होईल. राहुल गांधी खोटे बोलण्याखेरीज काहीही शिकलेले नाहीत.

“‘राहुल गांधी जेव्हा पहिल्यांदा भारत यात्रेवर होते, तेव्हा काँग्रेसचा ३ राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस संपूर्ण देशात पराभूत होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ३० जागाही जिंकता येणार नाहीत !’ – मुख्यमंत्री सरमा “