Tamil Nadu Wakf Board : तमिळनाडू वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पदाचा गैरवापर केल्यावरून चौकशी करावी !

सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !

तमिळनाडू वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अब्दुल रहमान

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अब्दुल रहमान यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी राज्याच्या सुफी इस्लामिक बोर्डाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आणि अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’) यांना पत्र लिहून केली आहे.

१. सुफी इस्लामिक बोर्डाने पत्रात म्हटले आहे की, अब्दुल रहमान यांच्या नेतृत्वाखाली तिरुचीच्या वेप्पूर येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती वर्ष २०२२ च्या प्रारंभीपासून सार्वजनिक आहे. अब्दुल रहमान त्यांच्या सार्वजनिक पदाचा गैरवापर करून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर निधी (पैसा) आणत आहेत. हा खंडणीचा पैसा आहे, जो सुमारे ३०० कोटी रुपये आहे. त्यासाठी रहमान यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. रेहमान याने अनुमती नसतांना परदेशातूनही पैसा गोळा केला आहे.

२. तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी सप्टेंबर २०२२ मध्ये अब्दुल रहमान यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. अजमल खान यांनी या संदर्भात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

३. सुफी बोर्डाचा आरोप आहे की, अब्दुल रहमान हे राजकीय पक्षांसाठी पैशांचे दलाल म्हणूनही काम करतात. राजकीय पक्षांना काळा पैसा मिळावा आणि तो पांढरा व्हावा यासाठी तो संपर्क साधतो. त्यासाठी त्यांनी ‘कैदे मिल्लत तमिळ पेरावई’ नावाची संस्था चालवली आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? सरकारने हे स्वतःहून करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !