गोव्यात प्रतिदिन एक रुग्णाचा कर्करोगाने होतो मृत्यू

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ

पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वर्ष २०२४ मध्ये कर्करोगामुळे ४०४ रुग्णांचा मृत्यू झाला. यानुसार प्रतिदिन कर्करोगाने ग्रासलेल्या एका रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोगाने बाधित रुग्णांविषयीचा तपशील नुकताच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा विधानसभेत मांडला आणि यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोगामुळे वर्ष २०२० मध्ये म्हणजेच कोरोना महामारीच्या काळात २३६, वर्ष २०२१ मध्ये २५६, वर्ष २०२२ मध्ये ३४२, वर्ष २०२३ मध्ये ३०२ आणि वर्ष २०२४ मध्ये ४०४ जणांना मृत्यू झाला. मूत्रपिंड, प्रोस्टेट ग्रंथी, मूत्राशय, अंडकोष, योनी, गर्भाशय, पोट, आतडी आदी जनन-मूत्रमार्ग यांच्याशी संबंधित कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर या पाठोपाठ फुप्फूस, त्वचा, डोके आणि मान यांसंबंधी कर्करोगाचे रुग्ण आढळत आहेत.

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक

मागील ५ वर्षांत इतर कर्करोगाच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गत ५ वर्षांत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोगाचे ५ सहस्र ८१६ रुग्ण आढळले. यामध्ये स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या १ सहस्र ४८३ (सुमारे २५.५ टक्के) होती. मागील ५ वर्षांत रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण ७.८ टक्क्यांनी घटले आहे.