पैसे आणि दडपशाही यांच्या जोरावर नियमबाह्य पद्धतीने काम ! – ग्रामस्थांचा आरोप
दोडामार्ग – स्थानिकांचा आक्षेप असतांनाही तालुक्यातील सासोली येथील सामायिक भूमीचा सर्वे ४ एप्रिल या दिवशी करण्यात आला. या वेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विनायक ठाकरे हे पोलीस बळासह सर्वे करण्यासाठी आले. ‘परप्रांतीय व्यक्तीचे सात-बारावर नाव नसतांनाही भूमीचा सर्वे कसा करता ?’, ‘आम्हाला तुम्ही नोटिसा पाठवल्याच कशा ?’, असे अनेक प्रश्न उपस्थित करून भूमीतील सहहिस्सेदारांनी सर्वे करण्यावर आक्षेप घेतला; मात्र ठाकरे यांनी सहहिस्सेदारांचा विरोध झुगारून पोलीस संरक्षणात सर्वेचे काम केले.
सासोली येथील घटनाक्रम
१. सासोली येथील सामायिक भूमीचा सर्वे करण्यापूर्वी भूमी अभिलेख विभागाने सर्व सहहिस्सेदारांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर ४ एप्रिल या दिवशी सकाळी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे हे पोलीसबळासह सर्वे करण्यासाठी आले.
२. या वेळी सहहिस्सेदार भूमीमालकांनी येथे येऊन या सर्वेला आक्षेप असल्याचे सांगितले. मोजणी करण्यास आलेल्या सात-बारात नोंद असलेल्या एका व्यतिरिक्त सर्व सहहिस्सेदारांचा मोजणीस आक्षेप असेल, तर ही मोजणी कृपया थांबवावी, अशी विनवणी केली; मात्र ‘भूमीअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसंदर्भात अर्ज आला असून कोणत्याही परिस्थितीत मोजणी केली जाईल’, असे अधिकारी ठाकरे यांनी सांगताच सहहिस्सेदार भूमीमालक संतप्त झाले. या वेळी ठाकरे यांनी कायद्याच्या भाषेत भूमीमालकांना सांगण्याचा प्रयत्न केला असता भूमीमालकांनीही त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिले. त्यामुळे ठाकरे निरूत्तर झाले.
३. त्यानंतर ठाकरे यांनी घटनास्थळावरून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र भूमीमालकांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
४. ‘मी नियमानुसार काम करत आहे’, असे ठाकरे यांनी सांगतांच, ‘हे नियमानुसार नसून तुम्ही पैशाच्या आणि दडपशाहीच्या जोरावर काम करत आहात’, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
५. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याकडे ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. पत्रकारांनी ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता ‘मी उत्तर देण्यास बांधील नाही’, असे सांगून त्यांनी काढता पाय घेतला.