दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचे प्रकरण

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर यापुढे अशी प्रकरणे होऊ नयेत; म्हणून उपाययोजना करण्यात येतील. या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे. आता राज्य सरकारने नेमलेली समिती सर्व पद्धतीने चौकशी करणार आहे. समिती सर्व त्रुटींमध्ये लक्ष घालणार आहे. भविष्यात अशी प्रकरणे होऊ नये; म्हणून काय करावे ? तेही समिती सांगणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबियांनी पुष्कळ कष्टातून उभारले आहे. त्यात अनेक उपचार होतात. सर्व चूक रुग्णालयाची नाही; परंतु कालचा प्रकार असंवेदनशील होता. जोपर्यंत आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही. कालचे आंदोलन जनआक्रोश होता, आज ‘शोबाजी’ केली जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आंदोलन करणार्यांना सुनावले.

मुंख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, अधिवेशनात कायद्यात पालट करण्यात आला आहे. काही अधिकार धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. सर्व धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन करणार आहोत. मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षही धर्मादाय आयुक्तांना जोडला जाणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले !
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे ट्रस्टी आणि वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सर्व आरोप पत्राद्वारे पुन्हा फेटाळले आहेत. घडलेला प्रकार आणि रुग्णालयाचा काहीही संबंध नसल्याचे केळकर यांनी म्हटले आहे.
डॉ. केळकर यांनी पत्रात म्हटले आहे की, महिलेच्या मृत्यूच्या घटनेमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले, तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली कि नाही हे आम्ही पडताळत आहोत. सदर महिलेच्या नातेवाइकांना मी स्वतः ‘तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा, शेष आम्ही सर्व साहाय्य करू’, असे सांगितलेले असतांनाही कुणालाही न कळवता ते निघून गेले. दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाला काळे फासल्यामुळे आमची मान शरमेने खाली गेली. सगळे पाहून लता मंगेशकर यांना मानणार्यांच्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे.
अनामत रक्कम घेतली जाणार नाही !
जेव्हा दीनानाथ चालू झाले, तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे; परंतु जसे उपचार, शस्त्रकर्म आणि रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यानंतर गुंतागुंतीची वैद्यकीय स्थिती असणारे रुग्ण वाढत गेले. तसे अधिक महागडे उपचार आवश्यक असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी चालू झाले. कालच्या उद्विग्न करणार्या घटनेमुळे आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला आणि यापुढे दीनानाथ रुग्णालय तातडीचे उपचार असणार्या कुठल्याही रुग्णाकडून तशी अनामत रक्कम घेणार नाही, असा विश्वस्त आणि व्यवस्थापन या सर्वांनी ठराव केला अन् आजपासून त्याची कार्यवाही चालू होईल.
रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल !
रुग्णालयाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. त्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहे. तनिषा भिसे या वर्ष २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. सदर महिला रुग्णाची वर्ष २०२२ मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५० टक्के शस्त्रक्रिया धर्मादाय लाभ घेऊन झाली होती. वर्ष २०२३ मध्ये या रुग्णाला रुग्णालयाच्या वतीने सुखरूप गर्भारपण आणि प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता. महिला रुग्णासाठी ७ महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसुती धोकादायक होती. त्याची कल्पना देण्यात आली होती. जुळी मुले असूनही महिला ६ महिने पडताळणीसाठी आली नव्हती. आगावू रक्कम मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाइकांनी तक्रार केली. ‘रुग्णास १० ते २० लाख रुपयांचा खर्च येईल, बाळांना दोन ते अडीच महिने रुग्णालयात ठेवावे लागेल, तुम्हाला जमेल तेवढे पैसे भरून भरती व्हा’, असे सांगितल्याचे समितीने म्हटले आहे.