‘म्युटेशन’ कामामध्ये लाच घेतल्याचे प्रकरण
(‘म्युटेशन’ – भूमीच्या मालकी हक्कात पालट करणे)
पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने ‘म्युटेशन’संबंधी कामासाठी ७ सहस्र रुपयांची लाच घेतांना सारझोरा पंचायतीचे तत्कालीन तलाठी जेरी फर्नांडिस यांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी शिस्तपालन समितीच्या अन्वेषणात तलाठी जेरी फर्नांडिस दोषी आढळल्यामुळे त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस् यांनी नुकताच काढला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सारझोरा येथील अविनाश डायस यांनी वर्ष २०१४ मध्ये तलाठी जेरी फर्नांडिस यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदार अविनाश डायस यांची सारझोरा येथील सर्व्हे क्रमांक १०९/६ बी या मालमत्तेची म्युटेशन प्रक्रिया लवकर करण्यासाठी तत्कालीन तलाठी जेरी फर्नांडिस यांनी १० सहस्र रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले होते. ही रक्कम अल्प करून ७ सहस्र रुपये देण्याचे ठरले होते. नुवे येथे तक्रारदार अविनाश डायस यांच्याकडून ही रक्कम घेतांना तलाठी जेरी फर्नांडिस याला भ्रष्टाचारविरोधी पथकाने २७ जून २०१४ या दिवशी रंगेहात पकडून कह्यात घेतले होते. त्यानंतर तलाठी जेरी फर्नांडिस यांना दक्षता खात्याने सेवेतून निलंबित केले होते आणि हे निलंबन १८ सप्टेंबर २०१८ मध्ये मागे घेण्यात आले. त्यानंतर केपे येथील तत्कालीन मामलेदार रमेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तपालन समितीने अन्वेषण चालू केले होते. या समितीने केलेल्या चौकशीत तलाठी जेरी फर्नांडिस यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते. याची नोंद घेऊन दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी तलाठी फर्नांडिस यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा आदेश काढला.