दहिवडी (जिल्हा सातारा) – येथील आधुनिक वैद्या (सौ.) निलीमा बोराटे, वैद्या (सौ.) सुनीता पालवे, वैद्या (सौ.) सुनीता दोशी, वैद्या (सौ.) मधुवंती डोंबे, होमिओपॅथी डॉ. (सौ.) स्वाती पोळ आणि होमिओपॅथी डॉ. (सौ.) वसुधा करणे या ६ वैद्यांनी प्रथा परंपरा जपत संक्रांतीच्या निमित्ताने नुकताच दहिवडी येथे अनोखा हळदीकुंकू समारंभ साजरा केला. या समारंभाला गावातील सर्व महिलांना आमंत्रित केले होते. सहस्रो महिलांच्या उपस्थितीत हा समारंभ उत्साहात पार पडला. या ६ वैद्यांनी विविध सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने ‘स्वामिनी’ नावाचा गट केला आहे.
हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य
१. प्रतिवर्षी हळदीकुंकू समारंभात वेगवेगळी ‘थीम’ ठेवली जाते. यातून महिलांना सामाजिक संदेश देऊन त्यांचे प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्यविषयक प्रबोधन, व्यायामाचे महत्त्व, आपल्या भारतीय सण-समारंभाचे महत्त्व, तसेच आपल्या प्रथा-परंपरा जपण्याचे महत्त्व या विषयाचा समावेश असतो.
२. अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या वनवासातील पर्णकुटीची प्रतिकृती सिद्ध केली होती. प्रभु श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि त्यांच्यासाठी पादुका घेऊन आलेला भरत, असे चित्र त्यांनी साकारले होते.
३. ‘प्रतिदिनच्या जीवनात उपयोगी असणारे, तसेच प्लास्टिक कचरा वाढू नये’, असा विचार करून वाण देतात. यामुळे दहिवडी गावातील अनेक महिलांनी त्यांचे अनुकरण करून नित्योपयोगी वस्तू वाण म्हणून दिल्या.
४. दहिवडी गावाचे भूषण ठरलेली एन्.सी.सी. विद्यार्थिनी कु. मानसी नाळे हिचा ‘सावित्री शक्तीपीठ सातारा’ आणि ‘स्वामिनी ग्रुप’ यांच्या वतीने आमदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सोनिया गोरे यांच्या हस्ते सत्कार केला. कु. मानसी नाळे ही ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही तिला २६ जानेवारी २०२४ या दिवशी राजपथावर संचलनाची संधी मिळाली होती.
५. ‘सावित्री शक्तीपीठा’च्या ‘सत्यमेव जयते’ या कॅलेंडरचे प्रकाशन केले.