Qatar Released Navy Officials : कतारने केली भारताच्या ८ निवृत्त नौदल अधिकार्‍यांची सुटका !

भारताच्या कूटनीतीचा विजय !

कथित हेरगिरीच्या आरोपावरून ठोठावण्यात आली होती फाशीची शिक्षा !

नवी देहली : कतारने अंततः ८ निवृत्त भारतीय नौदल अधिकार्‍यांची सुटका केली. या अधिकार्‍यांना कतारने हेरगिरीच्या आरोपावरून प्रथम फाशीची शिक्षा ठोठावली होती. भारताच्या हस्तक्षेपानंतर ही शिक्षा रहित करून जन्मठेपेत रूपांतरित केली होती. आता  त्यांची सुटकाच करण्यात आली. यांपैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आठव्या अधिकार्‍यांना भारतात परतण्यास विलंब झाला आहे. भारताच्या कूटनीतीचा हा विजय असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतला होता, असे सांगितले जात आहे.

सुटका झालेले भारताचे निवृत्त नौदल अधिकारी

१. कतारने या निवृत्त नौदल अधिकार्‍यांना शिक्षा सुनावल्यानंतर भारताने कतारला आवाहन केले होते, तसेच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रे होती त्यांची पूर्तताही केली.

२. जेव्हा निवृत्त अधिकारी देहली विमानतळावर पोचले तेव्हा त्यांनी ‘भारतमाता की जय’ या घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले.

१. ‘आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. ८ पैकी ७ जण भारतात परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली, याचा आम्हाला आनंद आहे !’ – परराष्ट्र मंत्रालय

२. आम्ही भारतात सुरक्षितपणे परतलो, याचा आम्हाला पुष्कळ आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता, तर आमची सुटका कठीण होती.’ – सुटका झालेले निवृत्त नौदल अधिकारी  

निवृत्त नौदल अधिकार्‍यांची नावे

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश


काय घडले ?

कतारमधील ‘अल् दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या आस्थपनात हे निवृत्त अधिकारी कार्यरत होते. या आस्थापनाकडून संरक्षणविषयक सेवा दिली जाते. या सर्वांना कथित हेरगिरीवरून ३० ऑगस्ट २०२२ या दिवशी कतार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने २६ ऑक्टोबर २०२३ या दिवशी याविषयी एक निवेदन प्रसारित करून या निकालाविषयी चिंता व्यक्त केली. ‘आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू’, असे भारताने म्हटले होते.

संपादकीय भूमिका

भारताने असाच प्रयत्न पाकिस्तानने अटक केलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठीही करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !