Pakistan Ask Proof To Indian Navy : भारतीय नौदलाने वाचवले पाकिस्तानी खलाशांचे प्राण; पण पाकला हवा ‘पुरावा’ !

पाकिस्तानचा कृतघ्नपणा !

इस्लामाबाद –  अरबी समुद्रात सोमालियाच्या दरोडेखोरांच्या कह्यातून पाकिस्तानी आणि इराणी खलाशांचे प्राण वाचवल्याने भारतीय नौदलाचे जगभर कौतुक होत आहे; मात्र पाकिस्तानमधील राजकीय तज्ञ कमर चीमा यांच्यासह अनेकांनी भारतीय नौदलाकडे याविषयी पुरावे मागितले आहेत. कमर चीमा यांनी, ‘विदेशी प्रसारमाध्यमे म्हणत आहे की, भारतीय नौदलाने १९ पाकिस्तानी खलाशांचे प्राण वाचवले आहेत. भारतीय नौदलाने जी नौका दरोडेखोरांच्या कह्यातून सोडवली, ती मूळची इराणची आहे. यात एकही पाकिस्तानी नागरिक सहभागी नाही. भारतीय नौदलाने या पाकिस्तानी खलाशांची नावे घोषित करावीत’, असे ‘एक्स’वर ‘पोस्ट’ केले होते.

चीमा यांच्या या पोस्टनंतर काही तासांनी भारतीय नौदलाने पाकिस्तानी खलाशांचा व्हिडिओ प्रसारित केला. (भारताच्या माणुसकीच्या कृतीतही दोषच पहाणार्‍या पाकिस्तानकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? – संपादक) भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस्. सुमित्रा या युद्धनौकेने अलीकडेच सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांच्या कह्यातून २ नौका सोडवल्या होत्या. यानंतर या नौकांवरील इराणी आणि पाकिस्तानी खलाशांनी भारतीय नौदलाचे आभार मानले.

पाकचे कृतघ्न नौदल

भारतीय नौदलाने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी आणि इराणी खलाशी ‘भारतीय नौदल झिंदाबाद’च्या घोषणा देतांना दिसत आहेत. नौदलाच्या व्हिडिओनंतर आता चीमा यांच्यावर सामाजिक प्रसारमाध्यमावर प्रचंड टीका करण्यात येत असून त्यांना क्षमा मागण्यास सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या नौदलाने या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत मौन बाळगले आहे. खलाशांना वाचवल्याविषयी पाकिस्तानी नौदलाने भारतीय नौदलाचे आभार मानण्याचा एक शब्दही उच्चारला नाही.