धर्म आणि देश यांच्या संरक्षणासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा व्हावे लागेल ! – टी. राजासिंह

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत सहस्रो हिंदूंचा धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याचा निर्धार !

टी. राजासिंह

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – या सभेचा एकच उद्देश आहे की, हुपरीतील प्रत्येक हिंदु हा कट्टर हिंदु बनला पाहिजे. हा देश अफझलखानाचा वध करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे यापुढील काळात धर्म आणि देश यांच्या संरक्षणासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा व्हावे लागेल ! आपल्याला सगळ्यांना धर्मासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन भाग्यनगर येथील भाजपचे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह ठाकूर यांनी केले. ते ३० जानेवारी या दिवशी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हुतात्मा स्मारक हुपरी येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते.

सभेला उपस्थित धर्माभिमानी

या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी यांनी सभेचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले.

विशाळगड अतिक्रमणमुक्त होण्यासाठी लढा तीव्र करा !

या प्रसंगी आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगड येथे अतिक्रमण झाले आहे. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांसमवेत हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना केली असून त्या माध्यमातून हे अतिक्रमण काढण्यासाठी लढा चालू आहे. या ठिकाणी असलेल्या शासनकर्त्यांकडून गडावर असलेल्या महापुरुष, मावळे यांच्या समाध्या, मंदिरे यांच्याकडे दुर्लक्ष होत असून तेथील दर्गा आणि परिसराचा विकास कसा होईल ? याकडेच अधिक लक्ष आहे. हुपरी शहरातही धर्मांधांनी शासकीय भूमीवर अतिक्रमण केले असून या संदर्भात एका धर्मप्रेमीने न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली आहे. अशा संदर्भात अन्य ठिकाणीही अतिक्रमण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात आजही क्रूरकर्मा आणि हिंदूंची हत्या करणार्‍या टिपू सुलतानचे चित्र काढणे, स्टेटसला ठेवणे अशा कृती अनेक धर्मांध करत आहेत. अशा धर्मांधांच्या विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मी मागणी करतो, तसेच अशा प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे.’’

उपस्थित पक्ष-संघटना-संप्रदाय

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, विविध स्थानिक संघटना-संप्रदाय

धर्मप्रेमींचा सत्कार

या प्रसंगी धर्मकार्यात सहभागी झाल्याविषयी धर्मप्रेमी सर्वश्री सचिन माळी, ओमराज माळवदे, ऋषिकेष साळी, शुभम पाटील, अवि बागल, रोहित माळी, महादेव आडावकर, किरण कुलकर्णी, नितीन काकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर

हुपरी येथील प्रथितयश उद्योजक श्री. राजेश शेट्ये, अधिवक्ता समीर मुद्गल, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकरराव ससे, ‘पैसा फंड बँके’चे अध्यक्ष श्री. शिवराज नाईक, हुपरी येथील उद्योजक श्री. राजेश शेट्ये, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. मुरलीधर जाधव, इचलकरंजी येथील पू. संतोष उपाख्य बाळ महाराज, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. उमेश दैने, श्री. अमर कुलकर्णी, श्री. संदीप पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, पू. संतोष कोळी उपाख्य बाळ महाराज, इचलकरंजी येथील श्री. संतोष हत्तीकर, श्री. पंढरीनाथ ठाणेकर, उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, सर्वश्री आनंदराव पवळ, निळकंठ माने, हिंदूराव शेळके, हुपरी येथील हिंदुत्वनिष्ठ सौ. सुनंदा औंधकर, श्री. राजेंद्र औंधकर, श्री. राहुल आवाडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराज गुरुजी, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, श्री. संतोष हत्तीकर, श्री. सुनील ताडे, उद्योजक श्री. राजेश भोजे, श्री. राहुल पोतदार, विश्व हिंदु परिषद जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे, पतीत पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. आप्पासाहेब बन्ननेवार, गव्यर्षी श्री. नितेश ओझा

क्षणचित्रे

१. बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस आणि त्यांचे कार्यकर्ते सभास्थळी ‘जय श्रीराम’ ‘बोल बजरंग बली की जय’ ‘हर हर महादेव’ यांसह अन्य घोषणा देत भगवा झेंडा घेऊन सभास्थळी उपस्थित झाले.

२. टी. राजासिंह यांचे सभास्थळी आगमन झाल्यावर युवकांमध्ये प्रचंड उत्साह ओसांडून वहात होता. हलगीच्या निनादात आणि ‘जय श्रीराम’ यांसह अन्य घोषणांनी मैदान दणाणून गेला.

३. हुपरी येथील मान्यवरांच्या हस्ते तिन्ही वक्त्यांना चांदीची तलवार देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा आणि देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणी दोषींना शिक्षा करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

देवस्थानांमधील भ्रष्टाचाराचे कारण पुढे करत सरकारने हिंदूंच्या अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले; मात्र सरकारीकरण केलेल्या प्रत्येक मंदिर समितीमध्ये आज भ्रष्टाचार, अनियमितता, दागिन्यांच्या नोंदी न सापडणे, भक्तांना मोठ्या प्रमाणात असुविधा होणे यांसह अनेक अनियमितता समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा देवस्थानामध्येही सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. प्रशासक नेमणे ही सरकारीकरणाची पहिली पायरी असून याला भाविकांचा तीव्र विरोध आहे. ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे; मात्र हे मंदिर सरकारीकरणापासून मुक्त झाले पाहिजे. याच समवेत शासनाने जी हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत, ती सर्व मुक्त करून देवस्थानांमधील गैरव्यवहारांच्या प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचा दानपेटी घोटाळा करणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना सरकार अद्याप शिक्षा देऊ शकलेले नाही. या घोटाळ्यानंतर नुकतेच पुन्हा एकदा श्री भवानीदेवीचे प्राचीन दागिने गायब होणे, चांदीचा मुकुट गायब होणे यांसह अनेक गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. श्री विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होऊन ३८ वर्षे झाली, तरी ३१४ हून अधिक प्राचीन अलंकार आणि दागिने यांचे मूल्यांकन अन् नोंदी झालेल्या नाहीत. तेथे प्रसादाचे लाडू, शौचालय, भक्तनिवास, ग्रंथालय आदी सर्वांत घोटाळे झाले आहेत. कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची ‘सी.आय.डी.’ चौकशी होऊन ८ वर्षे झाली यात दोषी कोण ? हे अद्याप बाहेर आलेले नाही कि दोषींना शिक्षा झालेली नाही. अशा स्थितीत भविष्यात संत बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण झाल्यावर येथेही अशाच प्रकारे अनागोंदी कारभार होणार नाही, याची हमी कोण देणार ?

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड दीर्घ कालावधीनंतरही अद्याप भाविकांसाठी खुले झालेले नाही. अद्यापही त्यात सांडपाणी मिसळत आहे. देवस्थानच्या भूमींच्या अनेक नोंदी अद्याप सापडलेल्या नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा ‘सी.आय.डी.’ अहवाल घोषित करून दोषींना तात्काळ शिक्षा करावी, अशीही मागणी मी या निमित्ताने करतो.

श्रीराममंदिरात रामलला आले; आता रामराज्यासाठी प्रयत्न करूया ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये

सनातन वैदिक हिंदु धर्मात विश्वकल्याणाची प्रार्थना केली आहे, त्याचसमवेत ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण जगाला सुसंस्कृत करू’, हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. पित्याच्या आज्ञापालनासाठी वनवास पत्करणार्‍या रामाचा हा देश आहे. त्यामुळे जर आपल्याला मनामनांत राम निर्माण करायचा असेल, तर सनातन धर्म समजून घ्यायला हवा. धर्माचरण म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड नाही, तर कर्तव्यपालन हाही धर्मच आहे. सनातन धर्म ही केवळ समजून घेण्याची नाही, तर आचरणात आणण्याची गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून धर्माचरण कसे करता येईल ? ते पहा. त्याचप्रमाणे अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण करायचे ठरवले आणि तेही पूर्ण केले आहे. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर श्रीरामलला हे श्रीराममंदिरात विराजमान झाले आहेत. आपल्याला येथपर्यंतच थांबायचे नसून प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे रामराज्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

आमदार टी. राजासिंह यांचे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने विमानतळावर स्वागत !

आमदार टी. राजासिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना खासदार श्री. धैर्यशील माने (डावीकडे जॅकेट घातलेले, दाढीवाले), खासदार श्री. धनंजय महाडिक (उजवीकडे)

कोल्हापूर – भाजपचे तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यावर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक, शिवसेना खासदार श्री. धैर्यशील माने, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिक श्री. आनंद पाटील, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. शरद माळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टी. राजासिंह यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

आमदार टी. राजासिंह यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हामुख श्री. उदय भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. निरंजन शिंदे, श्री. शाम जोशी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.