NitishKumar Alliance With BJP : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासमवेतची युती मोडून भाजपशी केली नवीन युती !

  • नवीन सरकारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

  • भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री !

मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासमवेत असलेली युती मोडून सरकार विसर्जित केले. त्यानंतर त्यांनी भाजपशी युती करत सरकार बनवत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर यांनी नितीश कुमार यांच्यासहित ९ जणांना शपथ दिली. यात भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. तत्पूर्वी या नवीन युतीकडून राज्यपालांना १२८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आल होते. या सरकारला काही अपक्ष आणि एच्.ए.एम्. पक्ष यांनी समर्थन दिलेले आहे.

त्यागपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, राष्ट्रीय जनता दलासमवेत राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर त्यागपत्र देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारले होते; परंतु तेव्हा मी बोलणे बंद केले होते. आम्ही सर्व परिस्थिती पहात होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर आज त्यागपत्र देऊन आमचे सरकार विसर्जित केले. आम्ही आधी भाजपसमवेत युती केली होती. ती युती तोडून यांच्यासमेवत (राजदसमवेत) आघाडी बनवली; परंतु येथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हते. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते श्रम करत होते; परंतु काही गोष्टींचे त्यांना वाईट वाटत होते. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोचलो.