Pakistani Intervention India’s Gyanvapi Issue : (म्हणे) ‘भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करा !’ – पाकिस्तान

पाकिस्तानची ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर संयुक्त राष्ट्रांकडे मागणी !

न्यूयॉर्क (अमेरिका) – भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या एका बैठकीच्या वेळी ही मागणी केली आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल उघड झाल्यानंतर पाककडून ही मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसारित करत या घटनेचा निषेध केला होता. पाकने म्हटले होते की, ६ डिसेंबर १९९२ या दिवशी जमावाने शतकानुशतके उभी असलेली मशीद पाडली. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने या घटनेला उत्तरदायी असलेल्यांना निर्दोष मुक्त केले. एवढेच नाही, तर त्याच ठिकाणी मंदिर उभारणीलाही संमती देण्यात आली. हे निंदनीय आहे.

१. मुनीर अक्रम यांनी ‘युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन’चे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात म्हणण्यात आले आहे की, भारतातील अयोध्येमध्ये पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या जागेवर श्रीराममंदिर बांधण्याचा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो. हा प्रकार भारतीय मुसलमानांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणासमवेतच प्रदेशातील सौहार्द आणि शांतता यांनाही गंभीर धोका निर्माण करतो. (आशिया खंडात कुणामुळे शांतता भंग पावते, हे जगाला ठाऊक आहे. त्यामुळे पाकने उगाचच यावरून बोलू नये, असे भारताने ठणकावले पाहिजे ! – संपादक)

२. पत्रात पुढे म्हटले आहे की, भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसाठी संयुक्त राष्ट्रांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. संयुक्त राष्ट्रांनी इस्लामशी संबंधित वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आणि भारतातील अल्पसंख्यांकांचे धार्मिक आणि सांस्कृतिक हक्क सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडायला हवी. (संयुक्त राष्ट्रांनी प्रथम काश्मीरमध्ये गेल्या ३३ वर्षांपासून काश्मिरी हिंदूंना पाकिस्तान पुरस्कृत जिहादी आतंकवादामुळे जो काही त्रास भोगावा लागत आहे त्याविषयी पाकला सुनावणे आवश्यक आहे ! – संपादक)

(म्हणे) ‘ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद यांना धोका !’

मुनीर अक्रम यांनी पुढे म्हटले आहे, ‘अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठा भारतातील मशिदी नष्ट करण्याचा प्रयत्न आणि धार्मिक भेदभाव दर्शवतात. प्रकरण बाबरी मशिदीच्याही पलीकडे गेले आहे. भारतातील इतर मशिदींनाही अशाच प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. दुर्दैवाने ही एकच घटना नाही; कारण वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही इदगाह मशीद यांसह इतर मशिदींनाही, अशा धोक्याचा सामना करावा लागू शकतो. (हिंदु कायदेशीर मार्गाने त्यांच्या मंदिरांवर बांधण्यात आलेल्या मशिदीची जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि श्रीरामजन्मभूमी अशाच मार्गाने त्यांना परत मिळाली आहे. त्यामुळे पाकचे अशा प्रकारचे विधान म्हणजे कांगावा आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान डावपेचांत भारतापेक्षा हुशार आहे, हे यातून लक्षात येते ! गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तानमध्ये हिंदु आणि शीख यांच्या धार्मिक स्थळांना तेथील मुसलमानांनी बेकायदेशीररित्या नियंत्रणात घेतले आहे किंवा बहुतांश स्थळे पाडली आहेत. त्याविषयी भारताने कधी पाककडे किंवा संयुक्त राष्ट्रांत अशा प्रकारचे सूत्र उपस्थित केले नाही, हे लज्जास्पद आहे !
  • भारताने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करत पाकिस्तान भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसत असल्यावरून कठोर शब्दांत समज देण्यास सांगितले पाहिजे !