Ayodhya Ramlala : श्री रामलला विराजमान !

बालस्वरूपातील श्री रामललाची मोहक मूर्ती

अयोध्या (उत्तरप्रदेश) – ज्या क्षणाची रामभक्त गेली ५०० वर्षे वाट पहात होते, तो क्षण २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी देशातीलच नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी अनुभवला ! रामभक्तांनी बालस्वरूपातील श्री रामललाचे मोहक हास्य ‘याची देही याची डोळा’ अनुभवले आणि ते भावविभोर होऊन त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू तरंगले ! भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात एकाच वेळी कोट्यवधी लोक एकत्रितपणे येऊन एखाद्या देवतेचे रूप पाहून त्यांची एकाच वेळी भावजागृती होणे, असा योग अनेक युगांमध्ये आला नसेल, असा दुर्मिळातील दुर्मिळ योग जुळून आला तो केवळ न केवळ अयोध्येतील भव्य श्रीरामाच्या मंदिरातील बालस्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतांना !

‘जगातील रामभक्तच नव्हे, तर त्रैलोक्यातून देवीदेवता, ऋषिमुनीही हा क्षण अनुभवत त्रैलोक्याधिपती भगवान श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीवर पुष्पवृष्टी करत होते’, अशी अनुभूतीही अनेकांना आली असणार, यात शंका नाही ! श्रीरामाच्या भव्य मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी पहातांना ‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे, आता भारतात रामराज्य आले आहे’, अशीही अनुभूती अनेकांना आली. ‘हिंदु राष्ट्र कसे असणार ?’, असे प्रश्‍न विचारणार्‍यांना ही स्थिती, म्हणजेच त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर होते. ‘हिंदु राष्ट्र’ हे संपूर्णपणे मर्यादापुरुषोत्तम, पतित पावन, सीताराम, कोदंडधारी राम, बालकराम या नामांतील भावाप्रमाणे कारभार करणारे असेल, हे यातून लक्षात आले असेल, यात शंका नाही.

अशी झाली प्राणप्रतिष्ठा !

पंतप्रधान मोदी पूजा करताना

दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीराममंदिर स्थळी आगमन झाले. हातात लाल वस्त्र आणि चांदीचे छत्रचामर घेऊन पंतप्रधान चालत श्रीरामंदिरात पोचले. गर्भगृहाबाहेरील जागेत काही वेळ पुरोहितांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे पुरोहित गागा भट्ट यांच्या वंशातील लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडून विधी करण्यात आले. त्या वेळी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारे प्रसिद्ध ज्योतिषी श्री. गणेश्‍वरशास्त्री द्रविड हेही उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुरोहित यांच्यासहित उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी गर्भगृहात प्रवेश केला. गर्भगृहात ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास महाराज, श्री रामललाचे मुख्य पुरोहित सत्येंद्र दास, गेल्या ७ दिवसांपासून प्राणप्रतिष्ठेचे मुख्य यजमान असणारे डॉ. अनिल मिश्र येथे आधीच उपस्थित होते. पुढील १५ मिनिटे प्राणप्रतिष्ठापनेच्या संदर्भातील विविध विधी करण्यात आले. १२ वाजून २९ मिनिटांनी श्रीराममूर्तीचा अभिजात मुहूर्तावर विधी प्रारंभ झाल्यानंतर मूर्तीचे संपूर्ण जगाला दर्शन घडवण्यात आले. यानंतर पुढे अर्धा घंटा अन्य विधी आणि नंतर आरती करण्यात आली. मूर्तीप्रतिष्ठेचे विधी पूर्ण झाल्यानंतर आणि पंतप्रधान मोदी यांचे भाषण झाल्यानंतर सर्व निमंत्रितांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले.

विधी करतांना भावविभोर पंतप्रधान मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेचा विधी करताना

प्राणप्रतिष्ठेचे विशेष यजमान असणारे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा विधी जवळपास १ घंटे करण्यात आला. या संपूर्ण विधीच्या वेळी पंतप्रधान मोदी भावविभोर स्थिती असल्याचे दृश्य दिसून आले. पंतप्रधान मोदी रामनामाचा जप करत, मंत्र म्हणत प्रत्येक विधी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने करतांना कोट्यवधी रामभक्तांनी पाहिले. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांकडून अशा प्रकारचा भाव व्यक्त होत असतांना जनतेने पाहिले. ‘देवतेची आणि तेही ५०० वर्षांनंतर प्रतिष्ठापित होणार्‍या भगवान श्रीरामासाठी भाव कसा असायला हवा’, हे पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रत्येक भक्ताला, साधकाला आणि शिष्याला अनुभवायला मिळाले.

वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर त्या ठिकाणी एका चौथर्‍यावर तंबूमध्ये श्री रामललाची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी तंबूतील श्री रामलला पाहून ‘येथे भव्य श्रीराममंदिर बांधल्यावरच पुन्हा येईन’, अशी प्रतिज्ञा केली होती. ‘ही प्रतिज्ञा आजच्या दिवशी त्यांच्या हस्ते या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन पूर्ण होत असल्याचे पाहूनही पंतप्रधान मोदी यांचा कृतज्ञतेचा भाव दाटून येत असणार’, असे रामभक्तांना त्यांच्याकडे पाहून जाणवत होते.

सोहळ्याला ७ सहस्रांहून अधिक निमंत्रितांची उपस्थिती !

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीराममंदिर परिसरामध्ये ७ सहस्रांहून अधिक निमंत्रितांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना विधी पहाता यावा म्हणून मोठे ‘एलईडी स्क्रीन’ची सोय ठिकठिकाणी करण्यात आली होती. निमंत्रितांमध्ये साधू, संत, महंत, वारकरी, विविध धार्मिक संप्रदायांचे प्रमुख, मुख्यमंत्री, मंत्री, अधिवक्ते, अभिनेते, खेळाडू, उद्योगपती आदी उपस्थित होते. या विशेष निमंत्रितांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही उपस्थित होत्या.

आरतीच्या वेळी निमंत्रितांकडून घंटानाद !

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती करण्यात आली. त्यापूर्वी मंदिराच्या आवारात उपस्थित निमंत्रितांना लहान घंटा वाटण्यात आल्या होत्या. आरतीला प्रारंभ झाल्यानंतर या सर्व निमंत्रितांकडून घंटानाद करण्यात आला.

भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरवरून मंदिरावर पुष्पवृष्टी !

श्रीराममंदिरात १२ वाजून २९ मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर मूर्तीचे दर्शन घडवण्यात आले. त्याच वेळी भारतीय सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरमधून मंदिरावर आणि मंदिर परिसरात आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

मंदिराच्या बांधकामातील कामगारांवर पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुष्पवृष्टी !

श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मंदिराच्या आवारात उपस्थित निमंत्रितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी गेली ४ वर्षे झटणारे कामगार आणि अभियंते यांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

क्षणचित्रे !

१. अयोध्यानगरीत जाणार्‍या मार्गावर दुतर्फा नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाहनातून आगमन झाले, तेव्हा सर्वांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला.

२. श्रीराममंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सर्वांना पहाता यावा, यासाठी अयोध्यानगरीत ठिकठिकाणी मोठे स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.

३. भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच अयोध्यानगरीत सर्वत्र प्रभु श्रीरामांचा जयघोष करण्यात आला.

४. श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्या शहरात ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली.

५. रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे मंच उभारून उत्तरप्रदेशमधील विविध सांस्कृतिक नृत्ये सादर करण्यात आली.

अयोध्यानगरीवर हेलिकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव !

प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर श्रीराममंदिरानंतर अयोध्यानगरीवरही हेलिकॉप्टरद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. या वेळी सर्व भाविकांनी हात उंचावून श्रीरामनामाचा जयघोष केला.

वैशिष्ट्यपूर्ण !

अनेक दिवसांनी झाले सूर्यनारायणाचे दर्शन !

मागील अनेक दिवसांपासून दुपारनंतरही अयोध्या शहरात धुके येत होते. २२ जानेवारी या प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळपासूनच आकाशात सूर्यनारायणाचे दर्शन झाले. धुके जाऊन ऊन पडले होते. त्यामुळे थंडीचे प्रमाण न्यून झाले.