बाणावली येथे ‘धिर्यो’च्या वेळी बैलाने शिंग खुपसल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
मडगाव, १७ जानेवारी (वार्ता.) : १५ जानेवारी या दिवशी सायंकाळी बाणावली समुद्रकिनार्याजवळ ‘धिर्यो’च्या वेळी बैलाने शिंग खुपसल्याने जेनिटो वाझ यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण कोलवा पोलिसांनी प्रथम अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते; मात्र ‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमांत फिरू लागल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला गेला आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ आणि प्राणी अत्याचार कायदा या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि कोलवा पोलीस आता ‘धिर्योे’चे आयोजन कुणी केले होते ? याच्या शोधात आहेत.
फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पथकाकडून सत्य उघड
‘धिर्यो’च्या प्रकरणी जेनिटो वाझ याच्या छातीवर डाव्या बाजूने आणि दोन्ही पायांवर बैलाने शिंग खुपसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शवचिकित्सेतून स्पष्ट झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पथकाने १६ जानेवारी या दिवशी सायंकाळी संबंधित गोठ्याला भेट देऊन पहाणी केली; मात्र फॉरेन्सिक पथकाला गोठ्यात रक्ताचे डाग किंवा अन्य काहीच संशयास्पद आढळून आले नाही. मृत जेनिटो यांच्या कुटुंबियांनी गोठ्यात गुरांना चारा घालतांना त्याला बैलाने शिंग खुपसल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे; मात्र ‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमात फिरू लागल्यानंतर आणि यामध्ये बैलाने जेनिटोवर आक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. जेनिटोच्या कुटुंबियांनी अन्वेषण यंत्रणेची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.