श्री क्षेत्र बल्लाळेश्वराच्या साक्षीने पाली येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !
पाली (जिल्हा रायगड) – छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच जुलमी इस्लामी पातशाह्यांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ ‘स्वराज्य’ नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होत आहेत. आज भारतभूमी धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची वाट पहात आहे. संघटन, साधना या दिशेने मार्गक्रमण करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार होऊया. शेवटचा श्वास असेपर्यंत मठ, मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्याचा प्रण घ्या, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाली सुधागड येथील गुजराती समाज सभागृह येथे ७ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. सभेचा प्रारंभ शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून झाला. देशभरात चालू असलेल्या समितीच्या व्यापक कार्याविषयी समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी सांगितले. सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते यांच्यासह शेकडो हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री क्षेत्र बल्लाळेश्वराच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार या वेळी पाली येथील ग्रामस्थांनी केला.