नागपूर – तृतीयपंथियांच्या वेशात आलेल्या ६ जणांनी पुणे-हटिया रेल्वे एक्सप्रेसमधील १० प्रवाशांना मारहाण करून त्यांना लुबाडले. ही घटना ४ जानेवारीच्या पहाटे घडली. पुणे-हटिया ही गाडी ३ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता पुणे येथून निघाली. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ती वर्धा स्थानकावर थांबली. सर्वांत शेवटच्या सर्वसाधारण डब्यात हे लुटारू चढले. प्रथम त्यांनी टाळ्या वाजवत पैसे मागायला प्रारंभ केला. ‘प्रत्येकाने किमान ५०० रुपये द्यावेत’, असे फर्मान सोडले. पैसे न देणार्या प्रवाशांना त्यांनी अमानुष मारहाण केली.
एका महिलेने पैसे नसल्याचे सांगताच तिच्या १ वर्षाच्या मुलीला त्यांनी हिसकावून घेतले. ‘पैसे दे, नाहीतर मुलीला घेऊन जाऊ’, असे ते सांगत होते. शेवटी अन्य प्रवाशांनी पैसे गोळा करून दिल्यावरच मुलीला सोडण्यात आले. जवळपास दीड घंटा गाडीत लुटारूंचा हा धुमाकूळ चालू होता. रात्री दीड वाजता अजनी-नागपूर यामध्ये रेल्वे गाडीचा वेग अल्प झाला, तेव्हा सर्व लुटारू उतरून पळून गेले. यापैकी ‘एकाच्या हाती पिस्तूल असल्याने घाबरून आम्ही विरोध केला नाही’, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका :कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अशा घटना घडतात ! |