सहनशील आणि आनंदी असलेल्या चंद्रपूर येथील श्रीमती कुसुम मोहनलाल महेश्वरी (वय ८४ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीमती कुसुम महेश्वरी यांना श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करतांना पू. अशोक पात्रीकर

चंद्रपूर – २३.१२.२०२३ या दिवशी चंद्रपूर येथे एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी साधकांना ‘सत्संगात उपस्थित असलेल्या श्रीमती कुसुम महेश्वरी (वय ८४ वर्षे) यांच्याकडे पाहून काय वाटते ?’, असे विचारले. त्या वेळी साधकांनी सांगितले, ‘‘काकूंच्या चेहर्‍यावर चैतन्य जाणवते आणि त्यांच्याकडे पाहून शांत वाटते. काकूंचा देव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्या परेच्छेने वागतात. त्या आज्ञापालन करतात. काकूंमध्ये शिस्त, तत्परता, संयम, स्थिरता इत्यादी गुण आहेत. त्यांचा स्वभाव प्रेमळ असून त्या कोणत्याही परिस्थितीत आनंदी असतात. त्यांना कशाचीही आसक्ती नाही. त्यांच्याकडे बघून भाव जागृत होतो. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।’ (भगवंताने आपणाला ज्या स्थितीत ठेवले, त्या स्थितीत रहावे. चित्ती मात्र समाधान असावे.) या तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार त्या आनंदाने आयुष्य जगत आहेत.’’

पू. पात्रीकरकाका यांनी काकूंना त्यांचे मनोगत व्यक्त करायला सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘माझी गुरुदेवांना भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि ती इच्छा गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी पूर्ण केली. मला जे हवे होते, ते गुरुदेवांनी दिले आहे. मी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. ‘त्यांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होण्यासाठी त्यांनीच मला शक्ती द्यावी’, एवढेच माझे त्यांच्या चरणी मागणे आहे.’’

पू. पात्रीकरकाका यांनी ‘श्रीमती कुसुम महेश्वरी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत’, असे घोषित केले. त्यांनी काकूंना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

श्रीमती कुसुम मोहनलाल महेश्वरी यांची त्यांची मुलगी सौ. भारती पवार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. सहनशील आणि आनंदी

‘माझी आई २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. तिचे संपूर्ण आयुष्य कष्टातच गेले. माझ्या बाबांनी आईला त्रास दिला, तरीही ते सर्व सहन करत तिने तिचे दायित्व शांतपणे पार पाडले. ती पुष्कळ सहनशील आहे. तिला कितीही शारीरिक त्रास होत असले, तरीही ती आनंदी असते.

२. परिस्थिती स्वीकारणे

आईने आम्हा ६ भावंडांना लहानाचे मोठे केले. त्यात तिचा पुष्कळ संघर्ष झाला, तरीही ती कधी खचली नाही किंवा तिने गार्‍हाणे केले नाही. मागील दीड वर्षांपासून ती माझ्या समवेत रहात आहे. तिने माझ्या कुटुंबातील सर्व रितीरिवाज आनंदाने ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारले आहेत.

३. स्वावलंबी

आई या वयातही स्वतःची सर्व कामे स्वतः करते आणि इतरांनाही साहाय्य करते.

४. नियोजनबद्ध दिनक्रम

आईचा दिनक्रम ठरलेला आहे. ती पहाटे साडेपाच वाजता उठते. नंतर स्नानादी आवरून प्रार्थना करणे, श्रीविष्णुसहस्रनाम वाचणे, तुळशीला पाणी घालणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मंदिरांत जाणे, यांत तिचा कधीही खंड पडत नाही.

५. प्रेमभाव

आई माझे सासरचे कुटुंबीय आणि शेजारी या सर्वांशी प्रेमाने बोलते अन् त्यांना आपलेसे करते. घरी कुणी साधक किंवा माझे नातेवाईक आले की, आई लगेच त्यांना पाणी आणून देते. ती सर्वांशी प्रेमाने बोलते.

६. सेवाभाव

आईला कुठली सेवा सांगितली की, ती तत्परतेने पूर्ण करते.

७. मायेतून अलिप्त

आई व्यक्ती किंवा वस्तू यांत अडकली नाही. तिला कशाचीही आसक्ती नाही.

देवाने मला प्रेमळ आई दिली आणि तिला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले, त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण अन् सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. भारती अरुण पवार (श्रीमती कुसुम महेश्वरी यांची मोठी मुलगी), चंद्रपूर, महाराष्ट्र. (१६.१२.२०२३)