१. रोपे लावतांना झालेले विविध त्रास !
१ अ. रामनाथी आश्रमात लावण्यासाठी चांगल्या कमळाचे रोप न मिळणे : ‘कमळपिठाच्या ठिकाणी कमळाची रोपे लावण्याच्या सेवेला आरंभ केल्यानंतर साधारण २ मास चांगल्या कमळाची रोपे शोधण्यातच गेले. काही केल्या आश्रमात लावण्यासारखे चांगले रोप मिळत नव्हते.
१ आ. कमळाची रोपे लावण्याची सेवा सोपी वाटणे; मात्र कमळपिठात लावलेले कमळाचे एकही रोप न जगणे : चांगल्या कमळाचे रोप मिळाल्यानंतर ते कमळपिठात लावतांना मला वनस्पतींची माहिती असल्याने ‘कमळाची रोपे लावणे सोपे आहे आणि मला ही सेवा सहज करता येईल’, या विचाराने मी ती सेवा केली. काही दिवसांनी आश्रमातील वाटिकेचे दायित्व असलेल्या साधिकेचा मला भ्रमणभाष आला. तिने मला सांगितले, ‘‘रोपाची पाने वाळत आहेत.’’ त्यानंतर ‘रोप व्यवस्थित जगावे’, यासाठी मी बुद्धीच्या स्तरावरील सर्व प्रयत्न केले, तरीसुद्धा एकही रोप जगले नाही.
१ इ. कमळाची रोपे लावण्याची सेवा करतांना गाडीचा अपघात होणे
१ इ १. दुचाकीचा अपघात होऊन गाडीची हानी होणे; मात्र कोणतीही इजा न होणे : कमळाची रोपे लावण्याची सेवा पूर्ण करून आश्रमातून अन्य सेवेला जात असतांना माझ्या दुचाकीला पाठीमागून येऊन अन्य गाडीने धडक दिली. या वेळी माझ्या दुचाकीची हानी झाली; पण मला कोणतीही इजा झाली नाही.
१ इ २. दुचाकी ‘पंक्चर’ होणे : दुसर्या वेळी कमळाची रोपे आणण्यासाठी सेवेला बाहेर पडल्यानंतर अकस्मात् वाटेत माझी दुचाकी ‘पंक्चर’ झाली. या वेळी देवाच्या कृपेनेच थोड्या अंतरावर ‘पंक्चर’ काढण्याचे दुकान मिळाले.
१ ई. तळ्यात पुष्कळ रोपे असूनही ती काढता न येणे : पहिल्या वेळी तळ्यातून कमळाची रोपे सहजतेने आणि अधिक प्रमाणात मिळाली होती. दुसर्या वेळी त्याच तळ्यात कमळाची रोपे आणायला गेलो, तर तेथे पुष्कळ रोपे असूनही ती सहजतेने काढता येत नव्हती. बराच प्रयत्न केल्यानंतर थोडी रोपे मिळाली.
१ उ. सहसाधकाच्या हाताला माशी चावल्यामुळे सूज येणे, औषधोपचार करूनही सूज न्यून न होणे आणि संतांनी सांगितलेला नामजप केल्यानंतर सूज न्यून होणे : दुसर्या वेळी कमळ लावण्याची सेवा झाल्यानंतर माझ्या समवेत आलेल्या साधकाच्या हाताला संध्याकाळी माशी चावली. त्यामुळे त्याच्या हाताला पुष्कळ सूज आली. आश्रमातील आधुनिक वैद्यांना विचारून औषधे घेतल्यानंतरही त्याच्या हाताची सूज आणि त्रास वाढत होता. रात्री त्रास होऊ लागल्यामुळे त्याला शासकीय चिकित्सालयामध्ये दाखवावे लागले. त्यांनी विविध चाचण्या करून त्याला औषधे दिली, तरी त्रासांचे प्रमाण न्यून होत नव्हते.
या वेळी आश्रमातून एका संतांनी त्याला एक नामजप करायला सांगितला. तो नामजप चालू केल्यानंतर त्याच्या त्रासाचे प्रमाण न्यून होऊ लागले. प्रत्यक्षात लागवडीची सेवा करतांना आम्हाला अधूनमधून किडे-मुंग्या चावत असतात; पण यापूर्वी अशा पद्धतीचा त्रास कोणालाही झाला नाही.
२. रोपे लावतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
२ अ. ‘कमळांमध्ये २ टक्के लक्ष्मीतत्त्व आहे’, हे वाचल्यानंतर लक्ष्मीकमळच लावण्यामागचे खरे कारण लक्षात येणे : कमळाची रोपे लावण्याची सेवा मिळाल्यानंतर माझ्या मनात ‘कमळाच्या अनेक प्रजाती असल्याने कोणतेही रोप लावले, तरी चालेल’, असा विचार आला. सेवेचे दायित्व असणार्या साधिकेने ‘आपण देवकमळच लावूया’, असे मला सांगितले. त्यानंतर मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. मधुरा भोसलेताईंचा (सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) कमळपिठाच्या संदर्भात आलेला लेख वाचला. त्यात ‘कमळांमध्ये २ टक्के लक्ष्मीतत्त्व आहे’, हे वाचल्यानंतर लक्ष्मीकमळ लावण्यामागचे कारण माझ्या लक्षात आले. ज्या ठिकाणाहून मी कमळाची रोपे आणली, तेथील फुलांपेक्षा आश्रमात आलेल्या फुलांचे छायाचित्र बघितल्यावर मला ते अधिक सुंदर आणि सात्त्विक जाणवले.
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करून देवीचा जप करत रोपे लावायला सांगितली आहेत’, असा निरोप मिळणे, तसे केल्यावर रोपे व्यवस्थित जगणे : दुसर्या वेळी कमळाची रोपे आणायला जाण्याआधी आम्हाला ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करून देवीचा नामजप करण्यास सांगितले आहे’, असा निरोप मिळाला. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना आणि नामजप करत कमळाची रोपे लावल्याने ती जगली. पहिल्या वेळी कमळाची रोपे लावतांना त्याला चांगली आणि अधिक प्रमाणात पाने होती, तर दुसर्या वेळी लावलेल्या कमळांच्या रोपांना पुष्कळ अल्प प्रमाणात पाने होती. त्यामुळे दुसर्या वेळी लावलेली ‘रोपे जगतील’, असे मला वाटत नव्हते. तरीही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप करत रोपे लावल्यामुळे कमळांची रोपे व्यवस्थित जगली.
२ इ. आश्रमात लावलेल्या कमळाच्या रोपाला दोन मासांत कळी येणे आणि ‘गुढीपाडव्यादिवशी ती उमलण्यामागे ईश्वरी नियोजन आहे’, असे जाणवणे : साधारण कमळाचे रोप लावल्यानंतर ३ – ४ मास झाल्यावर फुले येण्यास आरंभ होतो. ‘आश्रमातील कमळपिठामध्ये लावलेल्या कमळाच्या रोपाला २ मासांत कळी आली आहे’, असे समजल्यानंतर मला आश्चर्य वाटले. कळीचे छायाचित्र बघितल्यानंतर ‘पुढील ३ – ४ दिवसांत ही कळी उमलेल’, असे मला वाटले. प्रत्यक्षात ४ दिवस झाले, तरी कळी तशीच होती. आणखी २ दिवसांनी, म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी एक दिवस कळी अर्धी उमलली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण फूल उमलल्याचे समजले. यावरून ‘२ मासांत गुढीपाडव्याच्या दिवशी कमळ उमलण्यामागे ईश्वरी नियोजन आहे’, असे मला जाणवले.
२ ई. श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करून कमळाच्या बिया रुजत घातल्यावर ४ – ५ दिवसांतच बिया रुजण्यास आरंभ होणे : पहिल्यांदा लावलेली कमळाची रोपे जगली नसल्याने ‘पुढील वेळी कमळाची रोपे लावूया आणि बियांपासूनसुद्धा रोपे बनवूया’, असा निर्णय घेतला. कमळाच्या बियांचे बाहेरील आवरण कडक असल्याने बिया उगवण्यासाठी अधिक कालावधी लागतो आणि कमळाच्या बिया पुष्कळ अल्प प्रमाणात रुजतात. मी श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करून कमळाच्या बिया रुजत घातल्या. साधारण ४ – ५ दिवसांत बिया रुजण्यास आरंभ झाला आणि सर्व बिया रुजल्या. बियांपासून रोपे बनवण्यासाठी साधारण एक ते दीड मासाचा कालावधी लागतो; परंतु प्रार्थना करून रुजत घातलेल्या बियांपासून १५ ते २० दिवसांत रोपे सिद्ध झाली.’
– श्री. अमोल कुळवमोडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२२)