९ डिसेंबर या दिवशी झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या ५ व्या पतधोरण बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर बँकेच्या भाषेत ज्याला ‘रेपो दर’ म्हटले जाते, तो स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन हा किरकोळ महागाई दर जो आता ५.४ टक्के आहे तो ४ टक्के किंवा त्याच्या आतमध्ये आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न आहे. महागाई नियंत्रणासाठी आपल्याला दीर्घकालीन विचार करावा लागेल. त्यामुळे सध्या तरी व्याजदरात कपात करण्याची रिझर्व्ह बँकेची सिद्धता नाही.
१. महागाई भडकण्याची शक्यता !
या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे आणि सातत्याने होत असलेला अवेळी पाऊस, समवेत गारपीट यांमुळे अन्नधान्याच्या आणि साखरेच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊन, पुरवठा साखळी बिघडून, पुढील काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची किंवा महागाई भडकण्याची शक्यता आहे. त्यासमवेतच पुढील वर्ष हे लोकसभेच्या निवडणुकीचे असल्यामुळे विरोधक या गोष्टींचा लाभ घेण्याची शक्यता आहे आणि निवडणुकीच्या वर्षामध्ये सरकारला कुठलाही धोका पत्करण्याची इच्छा नसल्याने, केंद्राकडूनही भारतीय रिझर्व्ह बँकेला (‘आर्.बी.आय.’ ला) पतधोरण हे ‘महागाईला नियंत्रणात ठेवेल’, अशा रितीनेच आखण्याच्या सूचना दिलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मासिक हप्त्यामध्ये सध्या तरी काही घट होण्याची शक्यता नाही. जो काही व्याजदरात पालट होईल, तो वर्ष २०२४ मध्ये नवीन सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतरच होईल, असा अंदाज आहे.
२. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था विकासदर राखेल !
‘भारत आणि जगभरातील विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांकडे दृष्टीक्षेप टाकला असता आपल्याला जाणवते की, युरोप, अमेरिका आणि चीन यांच्या अर्थव्यवस्था या ३ ते ५ टक्के वाढीवर अडखळत असतांना भारतीय अर्थव्यवस्था मात्र ७ टक्क्यांच्या दमदार चालीने तिचा विकासदर राखेल’, अशी जगभरातील ब्लूमबर्ग, जागतिक बँक, मुडीस यांसारख्या संस्था आणि इतर आर्थिक विश्लेषकांची प्रतिक्रिया आहे. सर्र्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे विकसित देशांचे आणि अर्थ विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. त्यासमवेतच मागे सरलेल्या तिमाहीमध्ये निर्मिती क्षेत्राने आणि समवेत इतर ८ प्रमुख अशा सिमेंट, पोलाद, कोळसा, वीजनिर्मिती, खते अन् रसायने, वाहन उद्योग, सेवा क्षेत्रातील जोमाने झालेली वाढ ही अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासाचे प्रतीक आहे.
३. मुबलक परकीय गंगाजळी
आपल्या आजूबाजूच्या देशातील श्रीलंका, पाकिस्तान या देशांची अर्थव्यवस्था कुमकुवत आणि परकीय गंगाजळीच्या कारणांमुळे डबघाईला आलेल्या असतांना, भारताच्या परकीय गंगाजळीकडे पहाता डिसेंबरच्या पूर्वार्धाला प्रथमच आपल्या परकीय गंगाजळीने ६०० अब्ज डॉलरचा (६० लाख कोटी रुपयांचा) टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे देशाच्या बाह्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी किंवा आयात पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे मुबलक अशी परकीय गंगाजळी उपलब्ध आहे आणि यामुळेच विकसित देशांच्या चलनापेक्षा रुपया हा बर्यापैकी ‘डॉलर’च्या तुलनेत स्थिर झाला आहे !
४. रुपया स्थिर राहिला !
या वर्षी अमेरिकेने सरकारी रोख्यांचा परतावा मोठ्या प्रमाणात वाढवला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा अमेरिकेकडे वाढून ‘डॉलर’ भक्कम झाला; पण आपल्या भक्कम अशा परकीय गंगाजळीमुळे रुपयामध्ये फारसे चढ-उतार आपल्याला बघायला मिळाले नाहीत. जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी घडत आहेत, जसे रिशया-युक्रेन युद्ध, आता चालू असलेले इस्रायल-हमास युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या चढत्या किमती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने रुपयाची पडझड थांबवण्यासाठी मागील काही काळांमध्ये लवचिक आर्थिक धोरण स्वीकारले. चढे व्याजदर परकीय गुंतवणूक आकर्षित करतात. परिणामी रुपयाची मागणी वाढते आणि मूल्य वाढते. त्यामुळे चलन बाजारामध्ये रुपया स्थिर राहिला असून परकीय गंगाजळी वाढण्यामध्ये त्याने साहाय्य केले आहे.
५. भारतीय शेअर बाजार
भारतीय शेअर बाजाराकडे पाहिले असता अर्थ विश्लेषकांच्या मते आता भारतीय बाजाराची वाढ होण्यासाठी पुष्कळ मोठा वाव असून ‘निफ्टी’ २१ हजारी मनसबदार झाला असून ‘सेन्सेक्स’चा रंगीबेरंगी पतन हा आकाशामध्ये प्रतिदिन उंच उंच भरारी घेत आहे. सध्या त्यानेही ७० सहस्रांच्या पलीकडे उच्चांक गाठला आहे आणि वेगवेगळ्या आर्थिक संस्था, शेअर बाजारातील तज्ञ, अर्थविश्लेषक यांच्या मते येणार्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजार उत्तम प्रकारे वाढून निफ्टी २५ सहस्र मनसबदार, तर सेन्सेक्स हा लखपती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातील निवडक चांगल्या आस्थापनांमध्ये आणि ‘म्युच्युअल फंडा’मध्ये गुंतवणूक करून या वाढणार्या शेअर बाजाराचा लाभ करून घेतील, असे बहुतेक तज्ञांचे मत आहे. काही ‘मिड कॅप’ (मध्यम) आणि ‘स्मॉल (छोटी) कॅप’ आस्थापनेही गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचे तज्ञांना वाटते. ग्राहकांनी ठराविक काळाने त्यांच्या गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करून घ्यायला हवे.
६. म्युच्युअल फंड गुंतवणूक
मासिक ‘एस्.आय.पी.’ माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नियोजनबद्ध गुंतवणुकीचा मार्ग म्युच्युअल फंडाद्वारे उपलब्ध केल्यामुळे आणि काही निवडक म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षांपासून पुष्कळ चांगल्या प्रकारे परतावा देत आहेत. त्यामुळे म्युच्युअल फंडातील ‘एस्.आय.पी.’ने मासिक १७ सहस्र कोटींचा पल्ला पार केलेला आहे आणि आताही मोठमोठी म्युच्युअल फंड भारतातून प्रतिमास नाही, तर दिवसाकाठी १० सहस्र कोटींच्यावर गुंतवणूक कशी होईल, या संदर्भात त्यांचे नियोजन करत आहेत. त्यामुळे यापुढील काळात ‘शेअर मार्केट’चा रंगीबेरंगी पतंग प्रतिदिन नवनवीन उच्चांक स्थापन करतांना दिसू शकतो. त्यासमवेतच आता परकीय वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी भारतीय बाजारातून त्यांची गुंतवणूक काढून घेतली, तरी त्याचा पुष्कळ मोठा परिणाम आपल्या शेअर बाजारावर होणार नाही.
मोठ्या प्रमाणावर ‘एस्.आय.पी.’च्या माध्यमातून आणि वैयक्तिक ‘डिमॅट’ खात्याच्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ भारतीय शेअर बाजारामध्ये चालू आहे. वरील सर्व आर्थिक घडामोडींचा विचार करता भारतीय अर्थ बाजारामध्ये सध्या आनंदी आनंद आहे. यामध्ये काही जण त्या आनंदाचे तुषार आपल्या अंगावर उडवून घेत आहेत, अशी सध्याची स्थिती आहे.
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, ठाणे.
या लेखातील काही संज्ञांचे अर्थ१. ‘डिमॅट’ खाते : म्हणजे शेअर्स (समभाग), बाँड्स, डिबेंचर्स, सरकारी रोखे, शेअर्स सटिर्फिकेट्स (समभागाची प्रमाणपत्रे) आदी कागदी स्वरूपात न ठेवता (डिमटेरियलायजेशन करून) इलेक्ट्रॉनिक नोंदींच्या स्वरूपात ज्या खात्यात ठेवता येतात, असे खाते. २. निफ्टी : हा राष्ट्रीय समभाग विक्री बाजाराच्या सूचीत असलेल्या आस्थापनांचा हा निर्देशांक (इंडेक्स) असतो. ‘national’ (नॅशनल) आणि ‘fifty’ (फिफ्टी) या २ शब्दांपासून झालेला शब्द आहे. या निर्देशांकामुळे बाजाराच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यास आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास साहाय्य होते. ३. म्युच्युअल फंड्स : म्युच्युअल फंडामध्ये ग्राहकांकडून पैसे गोळा करून त्याचे स्टॉक (समभाग) किंवा बाँड्स खरेदी करतात आणि विकतात अन् ग्राहकाला लाभ मिळवून देतात. ४. एस्.आय.पी. – ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.’ यामध्ये आपण एखाद्या फंडमध्ये प्रतिमास ठराविक रक्कम भरून वार्षिक लाभ मिळवू शकतो. ५. मिड कॅप फंड्स – हे असे म्युच्युअल फंड्स आहेत, जे उच्च वाढीची क्षमता असलेल्या मिड कॅप (मध्यम) आस्थापनांमध्ये गुंतवणूक करतात. |