।। श्रीकृष्णाय नमः ।।
१. समाधी
‘समाधी’ हा विषय आला की, लगेच आठवण येते ती महर्षी पतञ्जलींच्या ‘योगदर्शन’ या ग्रंथाची पतञ्जलींचा ‘अष्टांगयोग’ आहे आणि ती आठ अंगे पुढीलप्रमाणे आहेत – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पहिली पाच अंगे मुख्यतः पुढच्या तीन अंगांची पूर्वसिद्धता आहे. पहिल्या पाच अंगांपेक्षा धारणा, ध्यान आणि समाधी अधिक अंतरंग साधना आहे. समाधीचेसुद्धा अनेक प्रकार आहेत; पण सविकल्प संप्रज्ञात समाधी, निर्विकल्प संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात निर्बीज समाधी हे मुख्य प्रकार आहेत. ‘योगदर्शन’ ग्रंथामधील सूत्रे समजायला अवघड आणि त्रोटक आहेत. सूत्रेच काय, एकेक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. तितक्या खोलात न जाता त्या योगाविषयी काही अन्य माहिती पुढे दिली आहे.
अ. ‘समाधी’ ही सुषुप्तीप्रमाणेच ‘कारण’ देहाची असते. आध्यात्मिक प्रगती झाल्यावर ‘कारण’ देहानंतर ‘महाकारण’ देहाची स्थिती येते. आत्मज्ञान झाल्यावर, साक्षीभाव झाल्यावर ही स्थिती होते. अशा स्थितीत समाधी लावण्याची इच्छा होत नाही आणि आवश्यकताच नसते.
आ. पातञ्जलयोगाचे मुख्य सूत्र आहे ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध: ।’ समाधिपाद सूत्र-२.
याचा अर्थ- चित्ताच्या वृत्तींचा निरोध हा योग आहे. पुढे या निरोधाचे फळ सांगितले आहे-
‘तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थानम्’ समाधिपाद सूत्र-३. म्हणजे जेव्हां चित्ताच्या वृत्तींचा निरोध होतो, तेव्हां द्रष्टा आपल्या स्वरूपात स्थित होतो.
इ. पातञ्जलयोगदर्शनानुसार असंप्रज्ञात निर्बीज समाधीने स्वरूपस्थिती होऊन कैवल्य प्राप्त होते.
ई. भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत या मार्गाचा उल्लेख केला आहे. ते सांगतात-
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ।। – अध्याय ६ श्र्लोक २०
तं विद्याद् दुख:संयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ।। अध्याय ६ श्र्लोक २३
अर्थ : ज्या अवस्थेत योगाच्या आचरणाने निरूद्ध झालेले चित्त उपरत होते आणि ज्या अवस्थेत स्वतःनेच स्वतःला पाहून (आत्मसाक्षात्कार करून) स्वतःतच संतुष्ट होतो, त्या योग म्हटले जाणार्या, दुःखाच्या संयोगापासून वियोगाला कंटाळा न करता जाणून घ्यावे.
इथे भगवान् श्रीकृष्णांनी चित्ताच्या निरोधाला योग न म्हणता दु:खाच्या संयोगापासून वियोगाला योग म्हटले आहे. कारण उघड आहे की दु:खमय संसारापासून मन आणि बुद्धीने वियोग झाला की ईश्वराशी योग होऊ शकेल.
उ. भक्ती आणि पातञ्जलयोग : पातञ्जलअष्टांगयोगाने जे साध्य होते, ते ईश्वराला पूर्णपणे शरण जाण्यानेसुद्धा होते, असे पातञ्जलयोगदर्शनमध्ये सांगितले आहे- ‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ – समाधिपाद सूत्र २३.
म्हणजे भक्तीने, ईश्वराला पूर्ण शरणागत होण्याने, असंप्रज्ञात समाधी होऊ शकते आणि त्यामुळे कैवल्य प्राप्त होऊ शकते.
ऊ. ज्ञान आणि पातञ्जलयोग
पातञ्जलयोगदर्शन सांगते -‘योगाङ्गानुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः । साधनपाद सूत्र २८
अर्थ : योगाच्या अंगांचे अनुष्ठान करण्याने, त्यांना आचरणात आणल्याने चित्ताच्या अशुद्धी गेल्यावर ज्ञानाचा प्रकाश विवेकख्यातीपर्यंत होतो. म्हणजे इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार यांच्याहून पूर्णतः वेगळे असे आत्म्याचे स्वरूप स्पष्ट होते.
२. भक्ती, ज्ञान आणि पातञ्जलयोग
अ. भक्तीमार्गात मन ईश्वरात लावले जाते. नवधाभक्तीतील शेवटची म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, संपूर्ण शरणागती केली जाते. चित्त शुद्ध झाले असेल, तर अशा भक्तीने सायुज्यता मुक्ती मिळू शकते.
आ. ज्ञानमार्गात चित्त शुद्ध करून आणि आत्मज्ञान प्राप्त करून आसक्तीरहित होऊन चित्त ब्रह्माच्या अनुसंधानात ठेवले जाते. याने मोक्ष मिळू शकतो.
इ. पातञ्जलयोगामध्ये चित्तवृत्तीनिरोधावर, म्हणजे मन रिकामे करण्यावर भर दिला आहे. पातञ्जलयोगात अष्टांगसाधनेने चित्त पूर्ण शुद्ध झाले असेल आणि वृत्तीशून्य म्हणजे रिकामे झाले असेल तर अशा शुद्ध रिकाम्या चित्तात स्वरूपज्ञानाचा उदय होऊन, विवेकख्याती होऊन, त्रिगुण ज्यातून व्यक्त झाले त्यात विलीन होऊन, कैवल्यप्राप्ती होऊ शकते.
३. सहजसमाधी
३ अ. ‘समाधी’ शब्दाची व्युत्पत्ती : ‘समाधि’ हा संस्कृत भाषेतील शब्द सम्+आ+धा असा बनला आहे. ‘सम्’ उपसर्गाचा अर्थ ‘योग्य रीतीने’, ‘आ’ उपसर्गाचा अर्थ ‘पर्यंत’आणि ‘धा’ धातुचा अर्थ ‘ठेवणे’ असा आहे. संस्कृत व्याकरणाच्या नियमांनुसार धा चा धि होतो (नियम-उपसर्ग धोः किः). ‘समाधि’ या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे – ‘ सम्यक् आधीयते मनः यस्मिन् ।’ म्हणजे ज्या अवस्थेत मन योग्य प्रकारे स्थिर ठेवले जाते, ती समाधी.
योगशास्त्रात ‘समाधी’ हा शब्द चित्ताची एकाग्रता आणि चित्तवृत्तींचा निरोध या दोन्ही अर्थांनी वापरला असला, तरी व्यवहारात ‘समाधी’ हा शब्द निरोधापेक्षा चित्ताच्या एकाग्रतेसाठी अधिक वापरला जातो. (टीप)
टीप – समाधी शब्दाची व्युत्पत्ती आणि विवरण श्री. मेघराज पराडकर यांच्या सौजन्याने.
३ आ. भक्तीमार्गाने सहजसमाधी : आपण जाणतो की, हे सर्व जग, विश्व, ब्रह्मांड, ईश्वरापासून बनलेले आहे. चर-अचर, दृश्य-अदृश्य, स्थूल-सूक्ष्म, सचेत-अचेत जे काही आहे, ते सर्व ईश्वरच आहे. अर्जुनाने विचारलेल्या ‘कोणकोणत्या भावांत, म्हणजे अस्तित्वांत आपण, मी चिंतन करण्याजोगे आहात ?’ (गीता अ.१० श्लोक १७). या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान् श्रीकृष्ण सांगतात, ‘नास्त्यन्तो विस्तरस्य मे ।’ (गीता अ.१० श्लोक १९)
अर्थ- ‘माझ्या विस्ताराला अंत(च) नाही.’ पुढे अर्जुनाला प्रत्येक गटातील श्रेष्ठ उत्पत्ती (जसे हत्तींमध्ये गजेंद्र इत्यादी) सांगून भगवान् श्रीकृष्ण म्हणतात –
‘विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।।’ गीता अ.१० श्लोक ४२
अर्थ : मी हे सर्व जग (माझ्या) एका अंशाने धारण करून स्थित आहे.
पुन्हा, गीता अ.७ श्लोक १९ मध्ये भगवान् श्रीकृष्ण सांगतात ‘वासुदेवः सर्वम्’ सर्व काही वासुदेव, ईश्वरच आहे. तात्पर्य हे की, सर्व जे काही भासते, दिसते, कळते, त्या त्या स्थूल-सूक्ष्म रूपात ईश्वरच आहे.
आद्य शंकराचार्य सांगतात ‘चित्तैकाग्य्रं समाधिः’ म्हणजे चित्ताची एकाग्रता ही समाधी असते (आधी सांगितलेली समाधी शब्दाची व्युत्पत्ती आणि आद्य शंकराचार्यांनी सांगितलेला अर्थ तत्त्वतः एकच आहेत).
आता, जर जिथे तिथे ईश्वरच आहे, तर मनुष्य काय, डोंगर काय, झाड काय, सर्वत्र भगवद्भावच राहील. सर्वत्र सर्वांमध्ये ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती होऊ लागली, तर जिथे दृष्टी जाईल, ज्यावर मन जाईल, तिथे ईश्वराचीच जाणीव झाल्याने चित्त ईश्वरावर एकाग्रच तर झाले ! नित्य व्यवहार नेहमीप्रमाणे होत राहूनसुद्धा चित्त भगवंतात लागून राहणे, ही सहजसमाधी, सहजस्थिती, सहजावस्था असते.
या विषयी वेगवेगळ्या संतांनी केलेले मार्गदर्शन पाहूया.
३ आ १. संत एकनाथ महाराज : भागवतधर्म सांगताना संत एकनाथ महाराजांनी या सहजस्थितीचा असा उल्लेख केला आहे – ‘जंव दृष्टी देखे दृश्यातें । तंव देवचि दिसे तेथे ।।’ एकनाथी भागवत २-३६४. अर्थ- जेव्हां दृष्टी (कोणत्याही) दृश्याला पाहते तेव्हां तिथे देवच दिसतो.
‘न लगे आसनभोजन । न लगे समाधीसाधन ।
माझिया प्राप्तीसी कारण । माझी भक्ति जाण उद्धवा ।।’ एकनाथी भागवत ११-१४९५
म्हणजे भगवान् श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की, माझ्या प्राप्तीसाठी आसन घालून समाधी लावण्याची आवश्यकता नाही. माझी (शुद्ध चित्ताने अचल-) भक्ती करून ईश्वरप्राप्ती होते.
संत एकनाथ महाराजांनी पुन्हा सांगितले आहे-
‘जयासी माझे अपरोक्ष ज्ञान । तेणे घालोनिया आसन ।
अखंड धरिता ध्यान । अधिक उपेग जाण असेना ।।’ – एकनाथी भागवत २८-३२७
म्हणजे भगवान् श्रीकृष्ण सांगतात, ‘हे जाण की, ज्याला माझे प्रत्यक्ष ज्ञान झाले त्याने आसनस्थ होऊन अखंड ध्यान लावले, तरी त्याचा काही अधिक उपयोग होणार नाही.’
३ आ २. संत ज्ञानेश्वर महाराज : ते सांगतात – जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । ज्ञानेश्वरी अ.१० ओवी ११८ (भूत म्हणजे प्राणी).
३ आ ३. समर्थ रामदास स्वामी : स्वामी सांगतात –
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहें ।। मनाचे श्लोक, २००
समर्थ म्हणतात की, ज्ञान झाल्यावर ईश्वराच्या रूपाचे आकलन होते. सर्वत्र तोच तो, तोच राम, ईश्वर दिसतो. ही केवळ कल्पना नाही. थोर संत हे अनुभवत असतात.
३ आ ४. संत सावता माळी : संत म्हणतात –
‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।।
लसून मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ।।
ऊंस गाजर रताळू । अवघा झालासे गोपाळू ।।’
अशा प्रकारे संसार-व्यवहार करत राहूनसुद्धा ज्याचे चित्त सदा भगवंतात लागलेले असते, तो नित्य सहजसमाधीतच असतो. याच स्थितीला ‘सहजावस्था’ असेही म्हणतात.
३ इ. ज्ञानमार्गाने सहजसमाधी
१. छान्दोग्योपनिषद्मध्ये सांगितले आहे- ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ अ.३ खण्ड १४ मन्त्र १
अर्थ : हे सारे विश्व खरोखर ब्रह्मच आहे.
अशा रीतीने ज्याला सदा सर्वत्र ब्रह्माचेच आकलन होते, तो काहीही पाहो, काहीही करो, त्याला तिथे ब्रह्मच जाणवत असल्याने त्याचे चित्त ब्रह्मावरच एकाग्र झालेले असते, म्हणजे तो समाधीतच असतो. अशा सहजसमाधीत असलेली व्यक्ती इतरांसारखाच संसार-व्यवहार करीत असली तरी ती समाधीतच असते. तिच्यासाठी समाधी-व्युत्थान, असे नसते.
२. भगवान् श्रीकृष्ण सांगतात –
‘ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्म्राग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।’ गीता अ.४ श्लोक २४
अर्थ : (यज्ञात) अर्पण करण्याचे साधन पळी (स्रुक्) ब्रह्म आहे, अग्नीत हवन केली जाणारी वस्तू (हवि) ब्रह्म आहे, ज्या अग्नीत हवन केले जाते, तो अग्नी ब्रह्म आहे (आणि) ज्याने हवन केले, तो ब्रह्मच आहे. अशा प्रकारे सर्वत्र ब्रह्मबुद्धी असणारा, ब्रह्मरूप कर्मामध्ये समाधिस्थ झालेला (ब्रह्मरूप कर्मामध्ये ज्याचे चित्त स्थिर झाले आहे तो) ब्रह्मालाच प्राप्त होतो.
३. समर्थ रामदास स्वामी हीच स्थिती अशा शब्दांत सांगतात-
सुन्यत्वातीत शुद्धज्ञान । तेणें जालें समाधान ।
ऐक्यरूपे अभिन्न । सहजस्थिती ।। दासबोध ६-१०-३९
म्हणजे, रिकाम्या मनाच्या पलीकडे शुद्ध आत्मज्ञान असते. त्या ज्ञानाने समाधान होते. आपला आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहोत या अभिन्नपणाच्या अनुभवाने सहजस्थिती प्राप्त होते. या स्थितीमध्ये सर्व व्यवहार होत राहिले, तरी ब्रह्माशी झालेले ऐक्य यथावत् राहते. त्यामुळे ही सहजस्थिती किंवा सहजसमाधी आहे.
४. आद्य शंकराचार्य म्हणतात –
‘देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि ।
यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः ।।’ – वाक्यसुधा श्लोक ३०
अर्थ : ‘मी’ पणा गळून गेला, स्वतः ईश्वरापासून वेगळे असल्याचा भ्रम नाहीसा झाला आणि परमात्म्याचे स्वरूप जाणले; जेथे जे काही भासते, दिसते, असते, ते सर्व परमात्माच आहे याचे आकलन झाले की, जिथे जिथे मन जाईल, तिथे तिथे समाध्याच असतात.
अशा प्रकारे अत्यंत बोधप्रद आणि निःसंदिग्ध शब्दांमध्ये आद्य शंकराचार्यांनी वास्तविक समाधी कशी असावी, हे स्पष्ट केले आहे. ही असते सहजावस्था किंवा सहजसमाधी !
– अनंत आठवले (७.१२.२०२३)
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून होऊ नये, यासाठी घेतलेली काळजीलेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. |