२६४ सेवेकरींचा गुरुचरित्र पारायणात सहभाग !
जळगाव, ३० डिसेंबर (वार्ता.) – धरणगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र येथे २० ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंतीनिमित्त अखंड नामजप, यज्ञ, गुरुचरित्र पारायण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहकाळात आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनपर अशा विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सण, व्रतवैकल्ये यांची प्रात्यक्षिक मांडणी दाखवून प्रबोधन करण्यात आले. सेंद्रिय शेती, वास्तूशास्त्र, आहार, आरोग्य, बालसंस्कार, मानवी जीवनात येणार्या समस्या यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सप्ताहकाळात २६४ सेवेकर्यांनी श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला. श्री स्वामी समर्थ मंत्रजप २१ लाख ६८ सहस्र ०४७ वेळा, श्री रामरक्षास्तोत्र ३ सहस्र ०२५ वेळा, श्री हनुमानचालीसा ६ सहस्र ३९२ वेळा, तसेच श्री स्वामीचरित्र पाठ, श्री दुर्गासप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती म्हणण्यात आले. या कालावधीत विविध देवतांचे यज्ञ याग झाले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी आरती करण्यात आली. या सप्ताहाला तालुक्यातील दहा सहस्रांपेक्षा अधिक भाविक सेवेकर्यांनी उपस्थिती नोंदवली.