अमेरिकेतील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा भारतीय वंशाच्या खासदारांकडून निषेध !

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी !

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील स्वामीनारायण मंदिरात खलिस्तान्यांनी केलेल्या तोडफोडीचा अमेरिकेतील भारतीय वंशांच्या खासदारांनी निषेध केला आहे. खासदार रो खन्ना म्हणाले की, यातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. मला आनंद आहे की, या घटनेमुळे सर्व जण संघटित झाले.

सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया 

१. खासदार राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्याला संघटित होऊन मंदिरांची तोडफोड करणार्‍यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे.

२. खासदार श्री. ठाणेेदार म्हणाले की, या घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे.

३. अमेरिकी वंशाच्या खासदार बार्बरा ली यांनी म्हटले की, कोणत्याही प्रकारचा द्वेष सहन केला जाणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आपल्याला हिंदुद्वेष मुळासह उखडून फेकला पाहिजे.

४. अमेरिकेच्या पोलिसांनी सांगितले की, पोलीस म्हणून आम्ही या घटनेमुळे दुःखी आहोत. हा प्रकार अयोग्य आहे. हे सहन केले जाणार नाही. आम्ही ही घटना गांभीर्याने घेतली असून त्याची चौकशी करत आहोत.

भारताबाहेरील फुटीरतावादी आणि कट्टरतावादी यांना थारा मिळू नये ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी या घटनेविषयी म्हटले की, आम्हाला याविषयी चिंता वाटते. भारताबाहेरील फुटीरतावादी आणि कट्टरतावादी यांना थारा मिळू नये. या प्रकरणी भारताच्या वाणिज्य दूतावासाने अमेरिका सरकार आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला विश्‍वास आहे की, या घटनेची चौकशी चालू आहे.