रत्नागिरी, २२ डिसेंबर (वार्ता.) – भारत शिक्षण मंडळ अंतर्गत पटवर्धन हायस्कूल आणि संजीवन गुरुकुल या शैक्षणिक संस्था चालवण्यात येतात. याच संजीवन गुरुकुलचा विद्यार्थी असलेला कु. सुदर्शन अशोक पाटील इयत्ता नववीमध्ये शिकत असून त्याला यावर्षीच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार १९ डिसेंबर या दिवशी देण्यात आला.
शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, नियमित अभ्यास करणे, सर्व खेळांमध्ये भाग घेणे, शिक्षकांशी आदराने वागणे, विद्यार्थी मित्रांशी खेळीमेळीने वागणे इत्यादी गुणांमुळे त्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच पुरस्कार मिळाला ! – कु. सुदर्शन पाटीलकु. सुदर्शन हा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. मुळातच शांत स्वभाव असलेला सुदर्शन नियमित नामजप करणे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे, प्रार्थना आणि कृतज्ञता करणे, प्रासंगिक सेवांमध्ये सहभागी होणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे इत्यादी प्रकारे साधना करत आहे. त्याचा प.पू. गुरुदेवांप्रती (सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) उत्कट भाव आहे. मिळालेला पुरस्कार त्याने प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. त्यांच्या कृपेमुळेच हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्याने या वेळी सांगितले. |