पाकिस्तानच्या दुरवस्थेला भारत उत्तरदायी नाही : पाकने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

नवाझ शरीफ

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या दु:स्थितीला भारत, अफगाणिस्तान किंवा अमेरिका कारणीभूत नसून त्याने स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. पाक सैन्याने वर्ष २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळे केले आणि देशावर एक सरकार थोपवले. हेच सरकार नागरिकांच्या समस्या आणि देशाची आर्थिक स्थिती बिकट होण्याचे कारण बनले, असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला. ते त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

नवाझ शरीफ पुढे म्हणाले,

१. देशातील न्यायाधीश कायदा तोडणार्‍या सैन्याच्या हुकुमशाहांचे माळा घालून स्वागत करतात. त्यांचे निर्णय योग्य ठरवतात. अशा हुकुमशाहांच्या सांगण्यावरून पंतप्रधानांना त्यांच्या पदावरून पायउतार होण्यास ते बाध्य करतात, तसेच संसद बरखास्त करण्याचा निर्णय सुनावतात.

२. वर्ष १९९९ मध्ये मी पंतप्रधान असतांना एकाएकी मला पदावरून काढून टाकण्यात आले. वर्ष २०१७ मध्येही माझ्यासंदर्भात असेच घडले.

३. वर्ष १९९९ मधील ‘कारगिल युद्धा’च्या योजनेला मी विरोध केला होता. यामुळे तत्कालीन सैन्यदलप्रमुखांनी मला पंतप्रधान पदावरून पायउतार केले होते.