(म्हणे) ‘दक्षिण आशियातील एका देशाला पारंपरिक शस्त्रास्त्रांचा अत्यंत सहजपणे पुरवठा !’ – महंमद उस्मान इकबाल जादून, पाकिस्तान

भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरून शस्त्रास्त्रे मिळत असल्याने पाकचा जळफळाट

महंमद उस्मान इकबाल जादून

इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकने पुन्हा एकदा भारतविरोधी राग आळवला आहे. असे करतांना त्याने भारताचे नाव मात्र घेतलेले नाही. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे उपस्थायी प्रतिनिधी राजदूत महंमद उस्मान इकबाल जादून यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हटले की, दक्षिण आशियातील एका देशाला पारंपरिक शस्त्रास्त्रांचा अत्यंत सहजपणे पुरवठा होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. यामुळे अस्थिरता वाढत आहे.

जादून पुढे म्हणाले की, दक्षिण आशियातील असमान विकासदर स्पष्ट आहे. यात एका देशाकडून सैन्यावर अन्य देशांच्या तुलनेत पुष्कळ खर्च होतांना दिसत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या विवादावर उपाय काढण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे अण्वस्त्र संपन्न देशांतील संघर्षही भडकू शकतो. जादून संयुक्त राष्ट्रांत ‘शांतीसाठी शस्त्रांस्त्रांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी यांमुळे उत्पन्न संकट आणि त्यावर उपाय’ या विषयावर बोलत होते.

संपादकीय भूमिका 

पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्‍चर्य !