पाकिस्तानी सैनिकांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर चीनचा निर्णय !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – युरोपीय देश इटलीने काही दिवसांपूर्वीच चीनच्या युरोपीय प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. आता चिनी ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तानमध्ये चीनने अनेक प्रकल्प चालू केले असून याला स्थानिक नागरिक, तसेच आतंकवादी संघटना यांच्याकडून वारंवार विरोध केला जात आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांच्या हत्यांच्या घटना घडल्या असून पाकमध्ये काम करणार्या चिनी अधिकार्यांनाही धमक्या मिळू लागल्या आहेत. हे सर्व पहाता चिनी सरकारने त्याच्या अधिकार्यांच्या पाकमध्ये फिरण्यावर बंदी घातली आहे. यामुळे चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरही याचा प्रभाव पडणार आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
१. चीनकडून ‘पाकिस्तान-चीन रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ नावाच्या महाकाय प्रकल्पासमवेतच अनेक विमानतळे आणि बंदरे यांची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पांसाठी चीनचे शेकडो अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा सैनिक कार्यरत आहेत.
२. संरक्षणतज्ञ कर्नल दीपक आहूजा (निवृत्त) यांनी यासंदर्भात म्हटले की, चीनने उचललेले हे सुरक्षिततेचे पाऊल त्याच्या पाकमधील प्रकल्पांवर थेट परिणाम करणारे ठरेल. गेल्या काही कालावधीपासून या अधिकार्यांना पाकमधून अंतर्गत विरोध होतच आहे. चिनी प्रकल्प पुढे नेणारे अनेक अभियंते आणि पर्यवेक्षक हेसुद्धा चिनी अधिकार्यांच्या कक्षेत येत असल्याने चिनी प्रकल्प खोळंबण्याची शक्यता आहे.