Chhattisgarh Journalist’s Murder : रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड केल्यानंतर पत्रकाराची हत्या

  • नक्षलवादग्रस्त बस्तर (छत्तीसगड) येथील घटना

  • ३ आरोपींना अटक

  • प्रशासनाकडून आरोपींचे बेकायदेशीर बांधकाम उद्ध्वस्त  

बस्तर (छत्तीसगड) – येथील प्रसिद्ध पत्रकार मुकेश चंद्राकर (वय ३३ वर्षे) १ जानेवारी या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ जानेवारीला त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये आढळून आला. ज्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे चंद्राकार यांनी उघड केले होते, त्याच रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी असणार्‍या नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी दिनेश, रितेश चंद्राकर आणि महेंद्र रामटेके या ३ आरोपींना अटक केली आहे. यांतील दोघे जण चंद्राकार यांचे चुलत भाऊ आहेत. पोलिसांनी आणखी एक नातेवाईक सुरेश चंद्रवंशी यालाही आरोपी केले आहे; मात्र तो पसार आहे. दुसरीकडे प्रशासनाने आरोपींचे बेकायदेशीर बांधकाम उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली.

१. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून मुकेश यांच्या हत्येविषयी दुःख व्यक्त केले.

२. ते म्हणाले की, या प्रकरणात आरोपींना सोडले जाणार नाही. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मी दिले आहेत.

३. मुकेश चंद्राकार यांनी अनेक वृत्तवाहिन्यात काम केले होते. तसेच बस्तर जंक्शन नावाचे त्यांचे स्वतःचे यू ट्यूब चॅनेलही होते.

४. बस्तरसारख्या नक्षलवादी भागात त्यांनी आजवर न घाबरता वार्तांकन केले होते. एप्रिल २०२१ मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले असता त्यांना सोडवण्यात मुकेश चंद्राकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.