India US Relation : भारताने पन्नूच्या हत्येच्या कटाचे अन्वेषण न केल्यास भारत-अमेरिका संबंधांसाठी धोका निर्माण होऊ शकतो !  

अमेरिकेतील ५ भारतवंशी खासदारांचा दावा !

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील भारतीय वंशांच्या ५ खासदारांनी ‘खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात भारताने अन्वेषण न केल्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध धोक्यात येऊ शकतात’, असे म्हटले आहे. एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि श्री ठाणेदार अशी या खासदारांची नावे आहेत.

१. या खासदारांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले की, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. असे पुन्हा कधीही होणार नाही, याची भारताने काळजी घेतली पाहिजे. भारताने अमेरिकेच्या भूमीवर असे षड्यंत्र पुन्हा रचू नये आणि तपासात पूर्ण सहकार्य करावे.

२. अमेरिकी सरकारने आरोप केला होता की, पन्नूवर न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक आक्रमण  करण्याचा कट रचण्यात आला होता. यात भारताचा हात होता. हा कट उधळून लावला. जून २०२३ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीनंतरच अमेरिकी अधिकार्‍यांनी हे सूत्र  भारतासमोर मांडले होते. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. तपासणीच्या निकालाच्या आधारे कारवाई केली जाईल. पन्नूकडे कॅनडा आणि अमेरिका देशांचे नागरिकत्व आहे.

संपादकीय भूमिका

भारतीय वंशांच्या खासदारांनी भारतद्रोही खलिस्तानी आतंकवादी पन्नूवर कारवाई करून त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणला पाहिजे. ते न करता त्यांनी उलट भारतालाच असा सल्ला देऊ नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !