India Canada Relations : कॅनडाशी भारताचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले ! – भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा

कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा

ओटावा (कॅनडा) – भारत-कॅनडा संबंध सप्टेंबरपेक्षा चांगले आहेत. भारताची सर्वांत मोठी चिंता ही आहे की, कॅनडाचे काही नागरिक भारतात आतंकवाद पसरवण्यासाठी त्यांच्या भूमीचा वापर करत आहेत. भारतीय मुत्सद्दी आणि इतर अधिकारी यांची सुरक्षा, हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे सूत्र आहे, असे विधान कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांनी येथील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

वर्मा पुढे म्हणाले की, भारत आणि कॅनडा संबंध सुधारण्यासाठी, तसेच एकमेकांच्या देशात राजनैतिक उपस्थिती वाढवण्यासाठी काम करत आहेत. भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी पुन्हा ई-व्हिसा सेवा प्रारंभ केली आहे.

कॅनडाने पुरावे सादर करावेत !

खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येसाठी भारताला कोणतीही चौकशी न करता दोषी ठरवण्यात आले. हे कायद्याचे राज्य आहे का ? या सगळ्यानंतर भारताला अन्वेषणात सहकार्य करण्यास सांगण्यात आले. ‘कॅनडाकडे काही पुरावे असतील, तर ते सादर करावेत’, असे भारताने नेहमीच म्हटले आहे, असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात संजय वर्मा यांनी सांगितले.

भारत सरकारने खलिस्तानी आतंकवाद्यांविरोधातील अनेक कागदपत्रे कॅनडाला दिली आहेत. त्यांनी भारत आणि कॅनडा येथे गुन्हे केल्याचे पुरावे आहेत, असे वर्मा यांनी या वेळी सांगितले. (एकीकडे भारताला निज्जर हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवायचे आणि दुसरीकडे खलिस्तान्यांना पाठीशी घालायचे, अशा दुटप्पी मानसिकतेचे कॅनडा सरकार ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कोणत्या आधाराद्वारे वर्मा असे विधान करत आहेत ? खलिस्तानी हिंदूंच्या मंदिरांना घेराव घालत आहेत, मंदिरांवर आक्रमण करण्याची धमकी देत आहेत आणि अशांवर अद्यापही कॅनडा कोणतीही कारवाई करत नाही, असे असतांना भारताचे संबंध कसे काय सुधारू शकतात ?