९ ऑक्टोबरपासून पालघर समुद्रकिनार्‍यावरील सागरी गस्त बंद !

पालघर – येथील किनार्‍यावर ९ ऑक्टोबरपासून पोलिसांकडून होणारी सागरी गस्त बंद आहे. जिल्हा प्रशासनाकडे स्वतःची गस्त यंत्रणा नसल्याने खासगी मालकीच्या बोटी समुद्रात गस्त घालण्यासाठी वापरण्यात येतात. यंदाच्या सागरी हंगामामध्ये ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर यादरम्यान पोलिसांनी खासगी बोटींद्वारे समुद्रामध्ये पहारा दिला; पण वर्षाला १०० दिवस ‘पॅट्रोलिंग’ करण्याचे निविदेमधील प्रावधान संपुष्टात आले. त्यामुळे आता तेथे कुणीही पहारा देत नाही.

सागरी सुरक्षिततेसाठी खासगी बोट उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पोलीस मुख्यालयातून मंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अनुसंशोधन केंद्र, तसेच डहाणू येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्प समुद्रकिनारीच वसलेले आहेत. तारापूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये १ सहस्र ३०० उद्योग कार्यरत आहेत. (देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील प्रकल्पांच्या ठिकाणची सुरक्षा वार्‍यावर असणे अक्षम्यच होय ! – संपादक) रेल्वे, तसेच महामार्ग यांच्या उपलब्धतेमुळे पालघर जिल्ह्यातून प्रवेश करून मुंबईपर्यंत सहज पोचता येऊ शकते.

संपादकीय भूमिका 

पालघरसारख्या मोक्याच्या ठिकाणातून जिहादी आतंकवादी भारतात शिरले, तर होणार्‍या भयावह परिणामांना उत्तरदायी कोण ?