‘साधना’, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न ! अनेकजण साधना म्हणून त्या संदर्भातील अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात. यामध्ये केवळ बुद्धीचा वापर होतो. साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते.
साधनेचे महत्त्व कळल्यावर मात्र साधनेसाठी मनाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवणे आवश्यक असते, उदा. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे, अधिकाधिक नामजप करणे. या टप्प्याला वेद, उपनिषदे, गीता यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास केल्यास त्यातून केवळ शब्दजन्य माहिती मिळते; पण त्याचा प्रत्यक्ष साधनेसाठी उपयोग होत नाही. यापूर्वीही अनेक संतांनी रामायण, महाभारत, गीता यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास न करताच संतपद गाठले आहे; कारण त्यांनी मनाच्या स्तरावर अधिक प्रयत्न केले होते. त्यामुळे साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी बुद्धीच्या स्तरावर न अडकता मनाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न करण्यावर भर द्या !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.११.२०२३)