वीर सावरकर उवाच !

आम्हा कोट्यवधी लोकांवर हिंदमातेची समान ममता आहे. वन्दे मातरम्चा मंजुळ कलरव ऐकून तिला प्रेमाचे भरते येते.  अशा प्रेममयीला आई म्हणण्याचे महत्भाग्य जिच्या प्रसादाने आम्हाला लाभले त्या पारलौकिक चित्शक्तीला आणि आमच्या या ऐहिक परमेश्‍वरी आर्यभूमतेला आमचा सदैव प्रणाम असो ! भूतलावरील समस्त सागरांची शाई केली, सर्व सुरतरुंची लेखणी केली आणि भारतमातेचे वर्णन करण्यासाठी प्रत्यक्ष शारदामाता पुढे सरसावली तरीसुद्धा हे आर्यमाते, तुझ्या गुणांचा पार लागणार नाही.

माणसांपेक्षा देव श्रेष्ठ, देवांमध्ये महादेव श्रेष्ठ; परंतु त्या महादेवाच्या मस्तकावर आरुढ झालेल्या भागिरथीने हे आर्यभूमी, तुला पुनित केले आहे. सिंधु शतद्रू, ब्रह्मपुत्रा, यमुना, यांच्या रूपाने हे भूमाते, तू तुझ्या लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय पय:सुधेचे अखंड ओघ सोडले आहेस. सिंधु आणि ब्रह्मपुत्रा, गंगा अन् यमुना, नर्मदा आणि गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तरंगिणींनी संपन्न असलेल्या भूमातेला आमचा नमस्कार असो !

(साभार : तेजस्वी तारे, वन्दे मातरम् समग्र सावरकर, खंड चौथा )

संकलन : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर