तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – वर्ष २०१७ मध्ये श्री तुळजाभवानी मंदिर विश्वस्तांकडून सशुल्क दर्शन चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य प्रार्थनास्थळांमध्ये शुल्क आकारून दर्शन घेण्याची पद्धत नाही; परंतु हिंदु मंदिरात सशुल्क दर्शन प्रकार चालू आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिरातील सशुल्क दर्शन बंद करावे, अशी मागणी ‘जनहित संघटने’च्या वतीने तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सशुल्क दर्शनव्यवस्था केल्याने अनेक घंटे रांगेत उभे रहाणार्या भाविकांवर अन्याय होत आहे. राज्यपालांच्या ७ सप्टेंबर २०१० च्या सूचनेला डावलून सशुल्क दर्शन चालू केले. विनामूल्य धर्मदर्शन २५ फूट अंतरावर, तर सशुल्क दर्शन २०० रुपयांत १० फूट अंतरावर, जवळून दर्शन ५०० रुपयांत देण्यात येत आहे. भाविकांमध्ये दुजाभाव करणे योग्य नाही. त्यामुळे ठराव तात्काळ रहित करून विधी आणि न्याय विभागाच्या सूचनेचे पालन करावे, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका :अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत ! |