पुणे – अमली पदार्थ तस्कर टोळीविषयी संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता आरोपींचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात आणखी ४ सदस्यांची नावे उघट झाल्यानंतर त्यातील आरोपी इम्रान शेख आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांसह यापूर्वी अटकेतील आरोपींची मोक्का कोठडीची मुदत २० नोव्हेंबरला संपली. त्यामुळे एकूण १३ आरोपींना न्यायालयात उपस्थित केले होते. तेव्हा पोलिसांनी गोपनीय अहवाल सादर केला.
मेफेड्रोन या अमली पदार्थाची निर्मिती, साठवण आणि वितरण यांविषयीची माहिती अन्वेषणात उघड झाली आहे. या गुन्ह्यात प्रत्येक आरोपीचा सहभाग उघडकीस आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून या साखळीचे सखोल अन्वेषण करण्यासाठी आरोपींना मोक्का कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी अधिवक्ता विलास पठारे यांनी केला.
अमली पदार्थांच्या विक्रीतून आरोपींनी विकत घेतलेली ८ किलो सोन्याची बिस्किटे, चारचाकी वाहने आणि महागडे भ्रमणभाष असा एकूण ५ कोटी ११ लाख ४५ सहस्र ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.