पाकिस्तानमध्ये अलीकडे ठराविक आतंकवाद्यांना लक्ष्य करून त्यांच्या अज्ञातांकडून हत्या केल्या जात आहेत. या प्रकरणांचा छडा लावण्यात पाकिस्तानमधील सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अलीकडे बलुचिस्तानमध्ये झालेल्या स्फोटांच्या संदर्भात पाकिस्तानचे गृहमंत्री सर्फराझ बुगती यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ला दोषी ठरवले आहे. या घटनांचा शोध लावण्यात पाकिस्तान अपयशी ठरला असल्याने कोसळलेल्या सुरक्षाव्यवस्थेऐवजी दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तान यासंदर्भात भारताला दोषी ठरवत आहे.
१. पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणेसमोर असलेल्या आव्हानांची कारणे
पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणेसमोर असलेल्या आव्हानांची अनेक कारणे असू शकतात. एक कारण, म्हणजे सध्या अफगाणिस्तानमध्ये चालू असलेला संघर्ष. अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) यांचे सैनिक काढून घेतल्यानंतर तेथील सत्तेमध्ये पोकळी निर्माण झाली. परिणामी ‘तालिबान’ आणि ‘हक्कानी’ यांसारख्या आतंकवादी संघटनांनी या परिस्थितीचा अपलाभ उठवला आहेे. अफगाणिस्तानमध्ये आकाश मोकळे झाल्याने या आतंकवादी गटांनी पाकिस्तानवर आक्रमण करण्यासाठी त्याचा लाभ घेतला आहे. दुसरे कारण, म्हणजे पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून चालू असलेला जातीय हिंसाचार. पाकिस्तानमधील सुन्नी आणि शिया या कट्टर धार्मिक गटांमधील तणावामध्ये या हिंसाचाराचे मूळ असू शकते. त्यात ‘लष्कर-ए-झांगवी’ आणि ‘लष्कर-ए-तालिबान’ या पाकिस्तानमधील आतंकवादी गटांमुळे हा तणाव अजून वाढलेला आहे. याखेरीज अलीकडे पाकिस्तानमधील लष्कराच्या सैनिकांवर झालेल्या आक्रमणांमुळे पाकिस्तानच्या लष्कराचे मनोधैर्य आणि त्यांची परिणामकारकता यांच्याविषयी काळजी निर्माण झाली आहे.
२. आतंकवादी गटांकडून एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आक्रमणे होण्याची शक्यता
मागील काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानमधील संघर्ष आणि जातीय हिंसाचार यांमुळे पाकिस्तानच्या लष्करावर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव आहे. या दबावामुळे सुरक्षेच्या संदर्भात परिस्थिती हाताळण्यास पाकिस्तानी लष्कराला कठीण जात असेल. पाकिस्तानमध्ये सध्या होणारी आक्रमणे ही दुसर्या आतंकवादी गटाकडून केलेले नियोजन असू शकते; कारण पाकिस्तानमध्ये २ आतंकवादी गटांमध्ये संघर्ष होण्याचा इतिहास पुष्कळ जुना आहे. त्यामुळे एका आतंकवादी गटावर आक्रमणे करून दुसरा आतंकवादी गट स्वतःचे महत्त्व वाढवू पहात असण्याची शक्यता आहे. ही सर्व आक्रमणे सूडापोटी केली असण्याची शक्यता आहे. ज्या आतंकवादी गटांवर आक्रमणे करून त्यांना लक्ष्य केले जात आहे, ते आतंकवादी गट पाकिस्तानमध्ये अत्याचार, तसेच नागरिकांच्या हत्या करून त्यांची मालमत्ता नष्ट करण्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे दुसरा आतंकवादी गट याचा सूड घेत असल्याची शक्यता आहे.
दुसरी एक शक्यता, म्हणजे वेगवेगळे स्रोत आणि भूभाग स्वतःच्या कह्यात ठेवण्यासाठी चाललेल्या स्पर्धेमुळे असे होऊ शकते. ज्या आतंकवादी गटांवर ही आक्रमणे होत आहेत, त्यांचे अमली पदार्थांची तस्करी होत असलेल्या मार्गांवर, तसेच इतर महसूल गोळा करण्याच्या स्रोतांवर नियंत्रण आहे. त्यामुळे हे स्रोत आणि भूभाग यांवर असलेले हे नियंत्रण हिसकावून घेण्याचा दुसर्या आतंकवादी गटाचा प्रयत्न असू शकतो.
३. आतंकवाद्यांकडून वैचारिक विश्वासाच्या विरोधात आक्रमण होण्याची शक्यता
अजून एक कारण, म्हणजे ज्या आतंकवाद्यांवर ही आक्रमणे होत आहेत, त्यांचा वेगवेगळा वैचारिक विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या वैचारिक विश्वासाच्या विरोधात असलेला आतंकवादी गट त्यांना नष्ट करू पहात आहे. त्यामुळे परिणामांचा कोणताही विचार न करता पाकिस्तानमध्ये पुष्कळ काळ आतंकवाद पोसला गेल्याने तेथील सुरक्षायंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याच्या स्थितीत आहे. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी भारताला दोष देणे, हा पाकिस्तानचा जुना इतिहास आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.