|
नवी देहली – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवाली वायूदल प्रशिक्षण तळावर ३ नोव्हेंबरला मध्यरात्री आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात ९ आतंकवादी ठार झाले होते, तर पाकचे ३ प्रशिक्षण देणारी विमाने नष्ट झाली होती, अशी माहिती पाकने दिली होती; मात्र आता उघडकीस आलेल्या माहितीनुसार पाकची ६ विमाने नष्ट झाली असून १२ सैनिक ठार झाले आहेत. या आक्रमणाचे दायित्व ‘तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने स्वीकारले होते.
या तळावर रॉकेट लाँचरचा वापर करून वायूदलाचा रडार टॉवरही उद्ध्वस्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याखेरीज विमानांचे उड्डाण आणि उतरणे (लँडिंग) यांच्या मार्गदर्शनासाठी वापरण्यात आलेले नियंत्रण कक्षही नष्ट झाले. या सर्व हानीवर पाकिस्तानी सैन्याने मौन बाळगले आहे. या आक्रमणात ९ नाही, तर ७ आतंकवादी ठार झाले. पाकने ९ आतंकवादी ठार झाल्याचे सांगितले होते. मौलवी महंमद बिन कासिम, कारी सलाहुद्दीन अयुबी, हुसेन अहमद मदनी, तारिक बिन झायेद, जाफरतियार शहीद, मुतासिम बल्लाह आणि ओसामा बिन झायेद अशी या ७ आतंकवाद्यांची नावे आहेत.