माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथ आदी मान्यवर बँकॉकमध्ये होणार्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करणार !

डावीकडून माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि योगी आदित्यनाथ

बँकॉक (थायलंड) – २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्यात आले आहे. ४ वर्षांनी एकदा आयोजित होणार्‍या या अनोख्या कार्यक्रमात, दक्षिण भारतातील थोर संत माता अमृतानंदमयी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर जागतिक स्तरावरून येणार्‍या प्रतिनिधींना संबोधित करणार आहेत.

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चे आयोजक स्वामी विज्ञानानंदजी यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की…

१. या वेळच्या परिषदेचे ब्रीदवाक्य ‘जयस्य आयतनम धर्म:’ (धर्म हा विजयाचा निवास) आहे. त्याअंतर्गत आयोजित केलेला हा कार्यक्रम बौद्धिक विचारांचा एक मोठा मेळावा आहे. या मेळाव्यात ६० हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

२. वर्ष २०१४ मध्ये देहली आणि २०१८ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या मागील परिषदांचे यश विचारात घेऊन या वेळी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’मध्ये अर्थव्यवस्था, शिक्षण, प्रसारमाध्यमे, राजकारण, युवाशक्ती, महिला आणि संघटना या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हिंदु समाजासमोरील आव्हाने आणि संधी यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

३. या मेळाव्यात श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्वस्त आणि खजिनदार स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, ‘झोहो कॉर्पाेरेशन’ या आस्थापनाचे संस्थापक श्रीधर वेंबू, शास्त्रज्ञ तथा प्रसिद्ध लेखक आनंद रंगनाथन्, इतिहासकार आणि सावरकर अभ्यासक विक्रम संपत, ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या संघटनेचे विनोद, ‘प्राच्यम् स्टुडिओज’चे प्रवीण चतुर्वेदी आदी नामवंत वक्ते त्यांचे विचार मांडतील.

४. या संमेलनामध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह, भारतातील वैद्यकीय उपकरण उत्पादक आणि ‘स्कॅनरे टेक्नॉलॉजीज’चे संस्थापक विश्वप्रसाद अल्वा, ‘स्टॅनफर्ड विद्यापिठा’चे प्रा. अनुराग मैरल, नेपाळचे अब्जाधीश उपेंद्र महतो, पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ते फकीर शिवा काछी, पत्रकार आनंद नरसिम्हन्, दक्षिण आफ्रिकेतील शिक्षणतज्ञ प्रा. आनंद सिंह यांच्यासह २०० हून अधिक तज्ञमंडळी चर्चेत सहभागी होणार आहेत.

५. ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ जागतिक हिंदु समुदायासाठी विचारविनिमय, सृजनशीलता आणि प्रतिभा वृद्धींगत करणारे एकत्रित व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. एक समृद्ध आणि न्याय्य समाज निर्माण करण्याचे ध्येय असलेल्या या जागतिक कार्यक्रमातून उद्योजक, गुंतवणूकदार आणि अर्थतज्ञ यांना प्रोत्साहन दिले जाते.

६. मानवाधिकारांचे उल्लंघन, भेदभाव आणि सांस्कृतिक आक्रमणे यांसारख्या समस्यांचे निराकरण करून परिषद चर्चेची संधी उपलब्ध करून देते आणि सहयोगी धोरणांना प्रोत्साहन देते.

७. शैक्षणिक क्षेत्रात ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ नवीन संशोधनाला प्रेरणा देण्याचे आणि सामाजिक सिद्धांतांना आव्हान देणार्‍या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत असते. विशेष करून जाती आणि धर्म यांच्या संबंधातील चर्चेला प्रोत्साहन दिले जाते. विचारसरणी आणि कथानके यांना आकार देण्यासाठी माध्यमांची प्रभावी भूमिका ओळखून ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ वृत्त आणि मनोरंजन या माध्यमांमध्ये अचूक अहवाल अन् चित्रण करण्याला प्रोत्साहित करते.

८. यश साजरे करून आणि समृद्ध भविष्यासाठी धोरण आखून ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ हिंदु धर्माच्या मूलभूत मूल्यांमध्ये रुजलेली सामायिक दृष्टी सशक्त करते. बँकॉकमधील ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ समृद्ध आणि शांततामय जगासाठीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

९. ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’च्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुशील सराफ यांनी सांगितले की, ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये सहभागी होणार्‍यांसाठी विविध प्रेक्षणीय स्थळांच्या भेटीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’ ही परिषद सहभागींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.