‘गो सेवा संघ रत्नागिरी’ने आयोजित केलेला ‘वसुबारस’ कार्यक्रम उत्साहात साजरा

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार करतांना ‘गो सेवा संघ रत्नागिरी’चे कार्यकर्ते

रत्नागिरी – ९ नोव्हेंबर या दिवशी ‘वसुबारस’दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे ‘गो सेवा संघ रत्नागिरी’ यांच्या वतीने ‘वसुबारस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामधे ‘गोपूजन, व्याख्यान आणि सत्कार’ असे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रोक्त पद्धतीने गोमाता आणि वासरू यांचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या प्रसंगी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गोपूजन पार पडले, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी गो सेवा संघाच्या कार्याची प्रशंसा केली. ‘पोलीस खाते गोरक्षणासाठी सदैव सज्ज असेल’, असे त्यांनी सांगितले.

‘वसुबारस’

कार्यक्रमाचे व्याख्याते सौ. रसिलाताई पटेल यांनी गो-सेवेचे महत्त्व, गायीचे वैज्ञानिक आणि भौगोलिक महत्त्व पटवून देत ‘गायीला आपण घरातून बाहेर काढले, त्याच समवेत आपले आरोग्यही गेले’, असे मार्गदर्शन केले.

गो सेवा संघासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साहाय्य करणार्‍या सेवा संस्था, संघटना आणि गोसेवक यांचे या वेळी सत्कार करण्यात आले. या वेळी गो सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी ‘गो सेवा संघ’ प्रयत्नशील !- गणेश गायकवाड

भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन आणि आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. जेणेकरून आपणास रत्नागिरी जिल्ह्यामधे एक प्रशस्त आणि आधुनिक गोशाळा उभारता येईल. जेथून गोसेवेचे महत्त्व आणि त्याचे लाभ शेतकर्‍यांना पटवून देऊन शेतकर्‍यांच्या घरोघरी गाय पुन्हा आणता येईल. तिच्यापासून मिळणारे गोमय आणि गोमूत्रापासून आर्थिक उत्पन्नही मिळेल, अशी व्यवस्था गो सेवा संघ भविष्यात उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती गो सेवा संघाचे अध्यक्ष श्री. गणेश गायकवाड यांनी दिली.