37th National Games : खेळाडूंसाठी सर्व सरकारी खात्यांमध्ये ४ टक्के आरक्षण ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप

पणजी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) : गोव्यात पूर्वी केवळ काही खात्यांमध्येच खेळाडूंसाठी आरक्षण होते; मात्र यापुढे गोव्यातील सर्व सरकारी खात्यांमध्ये खेळाडूंसाठी ४ टक्के आरक्षण दिले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात बोलतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.

समारोपस्थळी डावीकडून क्रीडामंत्री गोविंद गावडे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पी.टी. उषा

याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आदींचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ४६ पैकी ३९ खेळांमध्ये गोव्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. गोव्याची ओळख पूर्वी केवळ पर्यटनासाठी होती आणि आता क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यात साधनसुविधा उभारल्या गेल्या आहेत. या स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंनी एकूण ९२ पदके मिळवली आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे गोव्यात साधनसुविधांसमवेतच मानवी संसाधनही निर्माण झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गोव्याला झालेला हा लाभ आहे. स्पर्धेसाठीची सर्व ३९ मैदाने यापुढे ठराविक खेळांसाठी नामांकित केली जाणार आहेत.’’

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या भाषणात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल गोव्याचे कौतुक केले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत भरीव कामगिरी करत असल्याचे ते पुढे म्हणाले. सोहळ्याच्या प्रारंभी गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सोहळ्यात स्पर्धेतील उत्कृष्ट महिला आणि पुरुष खेळाडू, सर्वाधिक पदके मिळवलेला खेळाडू आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखेर उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांनी स्पर्धेचा समारोप झाल्याची घोषणा केली. यापुढील ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘देवभूमी’ (उत्तराखंड) येथे होणार आहे.