शिवसेना आणि ग्रामविकास पॅनल यांना संमिश्र यश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच ५ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ५६ सदस्य या पदांची पोटनिवडणूक यांसाठी ५ नोव्हेंबर या दिवशी मतदान झाले. २४ पैकी कुडासे खुर्द या ग्रामपंचायतीची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाल्याने एकूण २३ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक झाली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांमध्ये प्रामुख्याने ही लढत झाली. या निवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबर या दिवशी घोषित करण्यात आला. यामध्ये २४ पैकी १७ ग्रामपंचायतींवर भाजपने सत्तेचा दावा केला असून उर्वरित ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट), तसेच ग्रामविकास पॅनल यांना संमिश्र यश मिळाले आहे.
या निकालाविषयी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. ग्रामपंचायतींच्या एकूण १८७ सदस्य संख्येपैकी १३२ ग्रामपंचायत सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुडाळ तालुक्यातील वालावल-हुमरमळा या ग्रामपंचायतींमध्ये गेली कित्येक वर्षे शिवसेनेची (ठाकरे गटाची) सत्ता होती. या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे, मात्र भाजपचे ३ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकहाती सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजपने प्रवेश केला आहे.
मालवण तालुक्यातील सर्वांत मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या आचरा ग्रामपंचायतीत सरपंच पदासह ११ सदस्यही महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचा या ठिकाणी पूर्णत: पराभव झाला आहे.