मराठा आरक्षणप्रश्‍नी केंद्र सरकार लक्ष घालण्याची शक्यता !

अमित शहा यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देहलीत पाचारण !

डावीकडून देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – मराठा आरक्षणप्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने देहलीत पाचारण केले. ‘शहा या दोघांकडून मराठा आरक्षण प्रश्‍न समजून घेऊन या प्रकरणी ठोस निर्णय घेतील’, अशी शक्यता व्यक्त करण्यात आहे.

१. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे.

२. बीड येथे राजकीय नेत्यांच्या घरांंच्या झालेल्या जाळपोळीनंतर अमित शहा यांनी फडणवीस यांच्याकडून आढावा घेतला होता. त्यानंतर फडणवीस यांनी यात सहभागी असलेल्यांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी एकेरी भाषेत सरकार विशेषतः फडणवीस यांना ‘असे गुन्हे नोंदवून दाखवा, मग मी पहातो’, अशी चेतावणी दिली होती. जरांगे पाटील यांनी १ नोव्हेंबरच्या रात्रीपासून पाणी पिणेही सोडले आहे.

३. सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही मराठा आरक्षणावर सर्वमान्य तोडगा न निघाल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी ‘या प्रकरणी केंद्र सरकारने योग्य ती कारवाई करून हे प्रकरण हातावेगळे करावे’, अशी मागणी केली आहे.