मुसलमान तरुणींना हिजाब घालून नोकर भरतीच्या परीक्षेला बसू देण्याचा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचा निर्णय !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निर्णयाच्या विरोधात निदर्शने

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने येत्या २८ आणि २९ ऑक्टोबरला नोकर भरतीसाठी होणार्‍या परीक्षांसाठी मुसलमान तरुणी हिजाब घालून येऊ शकतात, असे घोषित केले आहे. या निर्णयाच्या विरोधात २५ ऑक्टोबर या दिवशी येथील फ्रीडम पार्कमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु संघटना यांनी निदर्शने केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरत कुमार, राष्ट्र-धर्म माध्यमाचे श्री. संतोष केंचंबा, हिंदुत्वनिष्ठ श्री. राघवेंद्र, श्री. विश्‍वेश्‍वरय्या यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित  होते.

सौजन्य क्लिक इंडिया

कर्नाटक सरकारने निर्णय त्वरित मागे घ्यावा !

१. समितीचे श्री. शरत कुमार म्हणाले की, यापूर्वी हिजाबच्या सूत्रावरून संघर्ष झाला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये गणवेष वापरण्यास सांगून हिजाबवर निर्बंध घातले होते. आता कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या नोकर भरतीसाठीच्या परीक्षेसाठी हिजाब घालण्याची अनुमती देऊन न्यायालयाचा अवमान केला जात आहे. यातून राज्य सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याचे उघड दिसत आहे. राज्य सरकारने, तसेच कर्नाटक सरकार प्राधिकरणाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.

२. श्री. संतोष केंचांब म्हणाले की, हिजाबच्या संदर्भात उच्च न्यायालयाने सखोल अभ्यास करून कोणत्याही कारणाने हिजाब घालण्यास अनुमती नसल्याचा निर्णय दिला असूनही राज्य सरकार अशी अनुमती देऊन धर्म भावनांना धक्का देऊन संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा मुलांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होईल.

संपादकीय भूमिका 

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या संदर्भात निर्णय दिलेला असतांना न्यायालयाचा अवमान करणारा अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकार घेते, हे लक्षात घ्या !