पुणे येथील ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना (उजवीकडे) श्री. सुनील घनवट आणि शेजारी श्री. पराग गोखले

पुणे, २६ ऑक्‍टोबर (वार्ता.) – तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी राबवण्यात आले. त्या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे येथे १५ ऑक्‍टोबरपासून अभियानास प्रारंभ झाला आहे. सिंहगड रस्‍ता, सातारा रस्‍ता, शिवाजीनगर गावठाण, कोथरूड, वडगाव शेरी, तळेगाव, चिंचवड, मंचर, जुन्‍नर, भोर या ठिकाणी ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर व्‍याख्‍यानांचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

१. या व्‍याख्‍यानांना अधिवक्‍ते, हिंदुत्‍वनिष्‍ठ, हितचिंतक, धर्मप्रेमी, उद्योजक, राष्‍ट्रप्रेमी असे मिळून सहस्रोंपेक्षा अधिक जणांची उपस्‍थिती लाभली.

२. कार्यक्रमाच्‍या शेवटी उपस्‍थितांनी ‘मी सनातन धर्मरक्षक आहे’, अशी प्रतिज्ञा केली. सनातन धर्माचे रक्षण करण्‍याचा निश्‍चय केला.

३. कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी झालेल्‍या चर्चासत्रांत उपस्‍थितांनी ‘सनातन धर्माविषयी ‘हेट स्‍पीच’ देणार्‍यांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट करणार’, असे सांगितले.

४. पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्‍हे नोंद करावेत, या मागणीचे पत्र पोलीस ठाण्‍यात देण्‍यात आले. हे पत्र सहकारनगर पोलीस ठाणे, सांगवी पोलीस ठाणे, चिंचवड पोलीस ठाणे, जुन्‍नर पोलीस ठाणे, मंचर पोलीस ठाणे, तळेगाव पोलीस ठाणे, सिंहगड रोड पोलीस ठाणे येथे हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने देण्‍यात आले.