अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणार्‍या दोघांना अटक !

१० लाख रुपयांहून अधिक मूल्य असणारा गांजा जप्त

मुंबई – अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने मुंबईतून दोघांना अटक केली. या प्रकरणी ११५ ग्रॅम उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य सुमारे १० लाख रुपयांहून अधिक आहे. ते खरेदी करण्यासाठी ‘बिटकॉइन’ अर्थ चलनाचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. (‘बिटकॉइन’ ही ऑनलाईन मुद्रा आहे. त्याला भौतिक स्वरूप नाही. ही मुद्रा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवता येते.) यश कलानी आणि सुकेतू तळेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात अमेरिकेतून आलेल्या पाकिटामध्ये गांजा असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका

टपाल यंत्रणेतून अशा प्रकारे अमली पदार्थांची तस्करी होत असेल, तर त्याविषयी भारतीय यंत्रणांनी अधिक सतर्क होऊन हे रोखणे आवश्यक !