‘काही साधकांना साधनेचे महत्त्व पटल्याने ‘साधना न करणार्या कुटुंबियांनीही साधना करावी’, अशी त्यांची अपेक्षा असते, तसेच साधना करत असल्याने ‘मला इतरांपेक्षा अधिक कळते’, असा सुप्त अहं जागृत झाल्याने त्या भूमिकेतून काही साधकांचे कुटुंबियांशी बोलले जाते. त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. याविषयी ‘साधकांनी दृष्टीकोन कसा ठेवावा ?’, हे हा लेख वाचल्यावर त्यांच्या लक्षात येईल.
१. साधकांचा कुटुंबियांशी वाद होण्याची करणे
१ अ. कुटुंबातील सदस्यांनी साधना करावी, यासाठी आग्रही असणे : साधकाला साधनेचे महत्त्व पटल्याने ‘साधना करणे आवश्यक आहे’, हे कळते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनीही साधना करावी; म्हणून साधक पुनःपुन्हा त्यांना आग्रही भूमिकेतून सांगत रहातात. त्यामुळे त्यांचे वाद होतात.
१ आ. कुटुंबियांना साधना करण्यास जमत नसल्यास ‘त्यांनी अधून-मधून सत्संगाला जावे, सेवा करावी’, अशा अपेक्षा असणे : कुटुंबीय साधना करत नसल्यास साधकांच्या ‘त्यांनी थोडा वेळ नामजप करावा, कधीतरी सत्संगाला जावे किंवा सेवा करावी, अर्पण द्यावे, ‘सनातन प्रभात’ वाचावा, सनातनचे ग्रंथ वाचावेत’ इत्यादी अपेक्षा असतात. कुटुंबियांकडून तसे झाले नाही, तर वाद-विवाद होतात.
१ इ. काळजी वाटणे : ‘पुढे घोर आपत्काळ येणार आहे. तिसरे महायुद्ध होणार आहे. या काळात नातेवाइकांचे कसे होईल ?’, अशी काळजी वाटून त्यांना पुनःपुन्हा सांगितले जाते. ते इतरांना न पटल्याने वाद होतात.
१ ई. शिकवण्याच्या भूमिकेत रहाणे : काही साधकांना ‘आपल्याला आता कुटुंबियांपेक्षा अधिक कळते’, असे वाटून प्रत्येक गोष्टीत ‘असे करा किंवा असे करू नका’ अशा प्रकारे शिकवण्याच्या भूमिकेतून सांगितले जाते. त्यामुळे वाद होतात.
१ उ. आध्यात्मिक पातळी अधिक असलेल्या साधकांना ‘कुटुंबियांनी त्यांचे ऐकावे’, असे वाटणे : काही वेळा एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी अधिक असेल, तर घरातील एखाद्या प्रसंगात ‘घरातील अन्य साधक किंवा कुटुंबीय यांनी त्याचे ऐकावे’, असे वाटते. यावरून अनावश्यक वाद होतात.
२. उपाययोजना
२ अ. साधकाने योग्य-अयोग्य यावर वाद न घालता स्वतःच्या साधनेच्या दृष्टीने जे अपेक्षित आहे, ते करणे : व्यवहारातील प्रसंगात साधकाने ‘योग्य-अयोग्य’ यावर वाद घालू नये, तर स्वतःच्या साधनेच्या दृष्टीने जे अपेक्षित आहे, ते करावे, उदा. ‘न्यूनपणा घेणे, साक्षीभावाने पहाणे, परेच्छेने वागणे, जे घडत आहे, ते ईश्वरेच्छेने घडत आहे’, असे योग्य ते दृष्टीकोन घेऊन वाद न घालता शांत रहावे. त्यामुळे ‘मला अधिक कळते’, हा अहंचा पैलू अल्प होण्यास साहाय्य होईल.
२ आ. साधनेतील अपराध : ‘एखाद्याला नामाची किंवा साधनेची गोडी नसतांना त्याला पुनःपुन्हा सांगणे, हा साधनेतील अपराध आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे.
२ इ. कुटुंबियांना त्यांच्या स्थितीनुसार आणि ऐकणारे असतील, तरच सांगावे : ‘बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी ।’ यानुसार ‘पूर्वसुकृत चांगले असल्याविना साधनेची गोडी निर्माण होत नाही’, हे लक्षात घेऊन साधकाने कुटुंबियांना त्यांच्या स्थितीनुसार देवपूजा करणे, देवळात जाणे, उपवास करणे या कृती अधिकाधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्यास सांगावे. कुटुंबीय ऐकणार असतील, तरच सांगण्याचा प्रयत्न करावा; अन्यथा ‘ईश्वरेच्छा’, असे म्हणून सोडून द्यावे किंवा तेथे साक्षीभावाने पहाण्याचा प्रयत्न करावा.
२ ई. साधकांनी कुटुंबियांच्या समवेत आदर्श (साधकत्वाने) वागावे ! : अनेक साधकांच्या संदर्भात असे लक्षात आले आहे की, ‘ते साधना करू लागल्यावर त्यांच्यात जे चांगले किंवा सकारात्मक पालट झाले आहेत, उदा. रागीटपणा, चिडचिडेपणा, अव्यवस्थितपणा, अपेक्षा करणे, आळस इत्यादी स्वभावदोष अल्प होणे, तसेच स्वतःहून कुटुंबियांना साहाय्य करणे, पुढाकार घेणे, इतरांना समजून घेणे, प्रेमभाव, नम्रता इत्यादी गुणांची वृद्धी होणे. हे लक्षात आल्याने कुटुंबियांच्या मनात साधनेविषयी जिज्ञासा निर्माण होते आणि ते हळूहळू साधना करू लागतात. हे लक्षात घेऊन साधकांनी घरात साधकत्वाने वागावे.
३. देवाला प्रत्येकाची काळजी असल्याने तो व्यक्तीच्या स्थितीनुसार मार्गदर्शन करून तिला साधनेत पुढे नेत असणे
आपल्यापेक्षा देवाला प्रत्येकाची काळजी असते. ‘साधनेकडे कोण आणि केव्हा वळणार ?’, याची वेळ भगवंताने निश्चित केलेली असते. ज्याच्या त्याच्या स्थितीनुसार मार्गदर्शन करून देव प्रत्येकाला पुढे नेत असतो, हे साधकाने लक्षात घ्यावे.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.८.२०२३)